यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा यांनी किशोर गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती महिला संघ उपांत्य फेरीत दाखल.

मुंबई:- यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा, यांनी अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या किशोर गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती महिला संघ उपांत्य फेरीत सहज धडकला. दादर, पोर्तुगीज चर्च येथील मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या सामन्यात यंग प्रभादेवी मंडळाने जय भारत क्रीडाचा प्रतिकार ५६-३२ असा संपविला. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात १९-१९ अशी बरोबरी होती. नंतर मात्र सामना एकतर्फी झाला. इस्माईल शेख यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. त्याला रितेश आगरकरची उत्कृष्ट साथ लाभली. श्रेयस मटकर, निशांत राणे यांचा खेळ विश्रांती नंतर ढेपाळला. महिलांच्या उपांत्य पूर्व सामन्यात शिवशक्ती महिला संघाने गोलफादेवी प्रतिष्ठानला ६८-१३ असे सहज नमवित आगेकूच केली. राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या शिवशक्तीने पूर्वार्धात ४३-०९ अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्र्चित केला होता. उत्तरार्धात थोडा नियंत्रित खेळ करीत विजय साकारला. प्रतिक्षा तांडेल, प्राची भादवणकर यांच्या झंझावाती खेळाला याचे श्रेय जाते. गोलफादेवीचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.

किशोर गटात विजय क्लबने मध्यांतरातील १७-२२ अशा पिछाडीवरून नवोदित संघाचे आव्हान ३७-३३ असे मोडून काढले. अनुज मिस्त, श्रेयस फुलेरे यांच्या दमदार व चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नवोदितच्या गणेश कांबळे, मानव सावंत यांचा खेळ नंतर कमी पडला. आकाक्षा मंडळाने डॉ. आंबेडकरचा ५१-४२ असा पाडाव केला. पहिल्या डावात २७-१९ अशी आघाडी घेणाऱ्या आकांक्षाने नंतर देखील त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. साहिल मिसाळ, नुर शेख यांच्या तुफानी खेळाने ही किमया केली. आंबेडकरचे आर्चित पेटकर, निमिष सावर्डेकर बरे खेळले. शिवनेरी सेवाने वेदांत सावंत, नील काणे यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या बळावर वारसलेन मंडळवर ४५-२१ अशी मात केली. वारसलेनचा निलेश परब चमकला. किशोर गटाच्या अन्य सामन्यात श्री समर्थ मंडळाने शिवशक्तीला ४६-२८असा, तर न्यू परशुराम मंडळाने श्री दत्त मंडळावर ४१-२० असा विजय मिळवित उपांत्य पूर्व फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *