रमेश औताडे
मुंबई : शौर्य चक्र पदक विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे यांची अतिरेक्यांबरोबर झालेली लढाईची कथा प्रेरणादायी होती. अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच आमचा देश सुरक्षित आहे. यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. असे लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा यांनी पराक्रम दिवसाच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस २३ जानेवारी २०२५ हा पराक्रम दिवस म्हणून परावर्तित झाला आहे. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून ” प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन ” आणि ” नृत्य नाट्य प्रोडक्शन ” यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘पराक्रम दिवस’ साजरा करण्यात आला.
यावेळी इतिहासकार रविराज पराडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास निवेदनात्मक पद्धतीने सांगितला. या सर्व कार्यक्रमांतर्गत भारतीय प्रांतीय लोकनृत्य, नांदी, पोवाडा हे मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. हा पराक्रम दिवस राष्ट्रप्रेम, भक्ती-शक्ती आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम होता.
राष्ट्र प्रेमाचं स्फुल्लिंग शालेय विद्यार्थी, तरुण, थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा यावेळी पेटवलं. हा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला गेला पाहिजे जेणेकरून राष्ट्रभक्तीचे देशप्रेमाचे धडे आमच्या मुलांना मिळाले तर वेगळी तरुण पिढी या देशात निर्माण होईल आणि आमचा भारत देश जगाचे नेतृत्व करण्यात समर्थ होईल असे त्यांनी सांगितले. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा !” ही सुभाषचंद्रांची घोषणा कर्नल सिन्हा यांनी उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘आझाद हिंद सेना’ डोळ्यापुढे उभी राहिली.
प्रज्ञावर्धिनी फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. रुपाली ठाकुर, विश्वस्त वैशाली बर्वे आणि विश्वस्त महादेव रानडे आणि नृतनाट्य प्रॉडक्शन्सच्या कु. वैष्णवी बर्वे यांच्या कार्य कुशलतेमुळे हा कार्यक्रम दिमाखदार रीतीने पार पडला.