ठाणे : 25 जानेवारीला 15 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा असल्याने त्यानुषंगाने 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सामुहिक मतदान शपथ घेण्यात आली.
या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावावा व मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी – कर्मचारी आदी उपस्थित होते.
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” ही सामुहिक शपथ यावेळी घेण्यात आली.