ठाणे शहरातील मध्यवर्ती  स्मशानभूमीमध्ये मातीचा पुरवठा करण्यात येत नसल्याने येथे अर्भकांचा दफनविधी करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसात येथे दफनविधी सुरू न केल्यास ठामपा मुख्यालयात आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक संगम डोंगरे यांनी दिला आहे.

ठाणे महानगर पालिकेकडून जवाहर बाग ही स्मशानभूमी संचालित करण्यात येत आहे. या स्मशानभूमीचे काही वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले आहे. हे नूतनीकरण करण्याआधी विद्युत आणि लाकडाच्या दाहिनी लगत लहान मुलांचा दफनविधी करण्यासाठी जागा ठेवण्यात आली होती. हिंदू धर्मात दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या मृत बालकांवर दहनसंस्कार न करता त्यांना दफन करण्यात येत असते. मात्र, या स्मशानात मातीचा पुरवठाच केला जात नसल्याने येथील दफनविधी अनेक वर्षांपासून बंद आहेत. परिणामी, लहान अर्भकांचे पार्थिव घेऊन कळव्यातील मनिषा नगर येथील स्मशानभूमीत जावे लागत आहे. या प्रकरणी संगम डोंगरे यांनी ठाणे पालिकेशी पत्रव्यवहार केला असून दोन दिवसात दफनविधी सुरू न केल्यास पालिका मुख्यालयात येऊन ठाणे पालिकेला माती देण्यात येईल, असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *