मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ माजी शिक्षक
ठाणे : कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव अन वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेले मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रवींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव शाळेने 18 जानेवारी 2025 रोजी शाळेत आयोजित केला होता.
आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, पुढाकार घेऊन हा सोहळा करणे म्हणजे एका कर्मयोगी शिक्षकांच्या जीवन प्रवासातील तो अत्युच्च आनंदाचा क्षण ठरावा. मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सरांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, माजी शिक्षक गणेश पेंडसे, सुबोध देशपांडे व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
या सुवर्णक्षणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमा केलेल्या निधीतून शाळेत अधिक दोन सौर ऊर्जा पॅनल चे उद्घाटन रवींद्र कृष्णाजी तामरस सरांच्या हस्ते केले. सरांच्या कार्याची, कर्तृत्वाची, अखंड सेवेची दखल उपस्थित प्रत्येकाने घेतली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्या प्रामाणिकपणाच्या निरलस सेवेचे भरभरून कौतुक केले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी मी घडलो तामरस सरांमुळे असे गौरवपर पत्र पाठवले. विविध क्षेत्रांतील उच्च पदावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तामरस सरांच्या मनोगतातून बालपणापासून ते वयाच्या 75 पर्यंतचा चढता आलेख ऐकून सरांच्या अचाट आणि अफाट स्मरणशक्तीचे सभागृहाने कौतुक केले. अत्यानंदाची बाब म्हणजे एरवी गौरवमूर्तीला भेटवस्तू म्हणून धनादेश दिला जातो उलट इथे मात्र तामरस सरांनीच मुख्याध्यापकांकडे दीड लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
गुरुवर्य कै. अक्षीकर, एस. व्ही. कुलकर्णी, कै. चितळे सर यांच्या संस्कारांमुळे, प्रेरणेमुळेच घडल्याचे सरांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ही त्यांनी कौतुक केले अशा हृदय सोहळ्याचे सुवर्णक्षण अनेकांनी आपल्या मनात आणि कानात साठवून ठेवले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व सहकारी शिक्षिका स्नेहा शेडगे यांनी केले.