अशोक गायकवाड
रायगड : कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने खालापूर विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रसायनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कर्जत प्रकाश संकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक रसायनी संजय बाबर, पोलीस निरीक्षक खोपोली शीतल राऊत, पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा, अग्निशमन दलाची गरज, अखंडित वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.