ठामपा शिक्षण विभागाचे आवाहन

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळांतून नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. या जाहिराती पालकांचे लक्ष वेधून घेत असून या माध्यमातून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असून पालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एकूण 81 शाळा अनधिकृत असून यात मराठी माध्यमाच्या 02, हिंदी माध्यमाच्या 02 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळा आहेत. या शाळांमधून आयसीएसई, सीबीएसई, आयबी तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या  रोजी प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी महापालिकेने दिनांक  30/7/2024 रोजी स्थानिक वृत्तपत्रात शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नव्याने सर्वेक्षण करुन अनधिकृत शाळांचा शोध घेण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांच्या सहकार्याने अधिकृत शाळेत समायोजन करणे, दिवा परिसरात महापालिका स्तरावरुन मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याबाबत  प्रयत्न सुरू आहेत, त्याचप्रमाणे अनधिकृत शाळांवर बालकांचा मोफत  व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सदरची शाळा अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी करावी. तसेच शाळेचा युडायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह आदी आहे किंवा नाही याची खात्री करुनच घ्यावी जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही असे आवाहन पालक नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

पालकांनी मान्यताप्राप्त शाळेतच पाल्यांचे प्रवेश करावेत. तसेच शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास ठाणे महानगरपालिका स्तरावर ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग, विष्णुनगर, नौपाडा या ठिकाणी संपर्क साधवा. पालकांनी त्यांच्या पाल्याचा अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहणार नाही याची नोंद घ्यावी असे शिक्षणधिकारी कमलाकांत मेहेत्रे यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *