प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम; १३३ उपकेंद्र, २६५ कार्यालयांचीही साफसफाई

ठाणे : भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिमंडलातील रोहित्र (डीपी), उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८९८ कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांनी परिमंडलातील २२१२ रोहित्र, १३३ उपकेंद्र आणि २६५ कार्यालयांची साफसफाई केली. महावितरणच्या या उपक्रमाचे वीज ग्राहकांनी स्वागत व कौतुक केले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आखण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे, नमिता गझदर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल यांच्यसासह ३५ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत भांडुप परिमंडल कार्यालयाची साफसफाई केली. तर ठाणे मंडल कार्यालयांतर्गत भांडुप, मुलूंड, ठाणे शहर एक आणि दोन, वागळे इस्टेट विभागात ४५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १३८७ रोहित्र, ४७ उपकेंद्र आणि ६१ कार्यालयांची स्वच्छता केली. वाशी मंडल कार्यालयातील नेरुळ, वाशी आणि पनवेल शहर विभागात ५५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०८ रोहित्र, ४८ उपकेंद्र आणि ५५ कार्यालयांमध्ये साफसफाई केली. पेण मंडल कार्यालयांतर्गत अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण विभागातील ८६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७१५ रोहित्र, ३७ उपकेंद्र आणि १४८ कार्यालयांमध्ये स्वच्छता केली.

यात रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी हटविण्यात आल्या. याशिवाय वाढलेले गवत रोहित्राच्या सभोवतीचा कचरा साफ करण्यात आला. शहरी भागात विविध सोसायट्यांमधील रोहित्रांच्या स्वच्छतेसोबतच काही ठिकाणी रोहित्र व वितरण पेट्यांना रंगरंगोटीही करण्यात आली. यातून रोहित्र परिसरातील अपघात टाळण्यास व परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत मिळेल. मुख्य अभियंता श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते राजाराम माने, संजय पाटील व युवराज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *