३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५
डेहराडून : गतवेळी केवळ एका पदकावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेमबाजी चमूकडून यावेळी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किमान १५ पदकांची अपेक्षा आहे. डेहराडून येथील त्रिशूल शूटींग रेंजवर २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय. जागतिक पदकविजेती कोल्हापूरची सोनम म्हसकर, तिचीच शहर सहकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणारी शांभवी क्षीरसागर व राष्ट्रीय पदकविजेती नाशिकची आर्या बोरसे हे त्रिकूट नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अचूक वेध साधण्यासाठी एकाग्रचित्त होतील. या प्रतिभावान नेमबाजांकडून महाराष्ट्राला उद्या पदकांची अपेक्षा असेल. मागील गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राला नेमबाजीतील एकमेव पदक जिंकून दिले होते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राचे नेमबाज किती पदके जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.
कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदा
ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.
