उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील व आता बंद असलेल्या हिंदुस्थान कंपोजिटस लिमिटेडमधील (फेरोडो) ११०० कामगारांचा थकलेला महागाई भत्ता- डिएचे वितरण धनादेश देऊन उद्या बुधवारी सकाळी ११ वा. मातोश्रीवर होणार आहे. हे वितरण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काही कामगारांना धनादेश देऊन प्रतिकात्मक करण्यात येणार आहे.
नंतर या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आमदार सुनिल राऊत, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे,मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ आणि कामगारांच्या उपस्थितीत बुधवारीच सायंकाळी ५ वा. एसएनडीटी कन्या महाविद्यालय सभागृह घाटकोपर पश्चिम येथे होणार आहे.
अशी माहिती या डिएची थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रमुख कार्यकर्ते शिवसेना माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांनी दिली.
या कार्यक्रमास माजी महापौर महादेव देवळे, हिंदुस्थान कंपोजिटसचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार चौधरी,माजी नगरसेवक सुनिल भालेराव हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक रवींद्र कोठावदे, शिवसेना उपविभागप्रमुख विजय पडवळ, शाखाप्रमुख निलेश पोहरकर यांनी केले आहे.
हा थकीत डीए मिळावा यासाठी नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील,अप्पा चव्हाण,एल.जी.नाईक यांनीही प्रयत्न केले.या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे,सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली.या पार्श्वभूमीवर विक्रोळीत संदेश विद्यालयात हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांची एक बैठक झाली. थकीत डीएचा लढा ३० वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होईना शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा आऊट ऑफ कोर्ट सोडवावा, कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली.त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिटसच्या मालकांशी चर्चा केली.त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले.
त्यानुसार सुवर्णमध्य काढून प्रत्येक कामगाराला,मृत कामगारांच्या वारसाला ही डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे. ३० वर्षांच्या लढ्यानंतर हे पैसे मिळत आहे,ही आम्हा सर्व कामगारांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,असे नंदू आंबोकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार सुनिल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.