देशात 2006 मध्ये आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर आपत्ती निवारण कक्ष कार्यरत असतात. खारघर, हाथरस, दतिया, वैष्णोदेवी, मोरबी आणि आता प्रयागराजच्या घटनांच्या वेळी अशी आपत्ती निवारण दले कुठे जातात, असा प्रश्न पडतो. प्रयागराज महाकुंभाला 28 कोटींपासून 41 कोटीपर्यंत लोक येतील, असा अंदाज असताना त्यातून उत्तर प्रदेशमध्ये चार लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचे चित्र रंगवण्यात आणि देशभरातील वृत्तपत्रांतून प्रसिद्धी करण्यात जेवढा वेळ आणि पैसा खर्ची घातला, त्याच्या काही टक्के रक्कम जरी कृत्रिम प्रज्ञा वापरून गर्दीचे व्यवस्थापन करण्यात घालवली असती, तर चेंगराचेंगरीची घटना टाळता आली असती. केदारनाथ, बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची नोंदणी करून कुणाला कधी बोलवायचे, याचे जसे नियोजन केले जाते, तसेच नियोजन महाकुंभाच्या शाहीस्नानाच्या तारखांसाठी अगोदर नोंदणी करून करता आले, तर गर्दीचे व्यवस्थापन नीट होऊ शकेल. केदारनाथ, बद्रीनाथच्या यात्रेच्या दिवसांची संख्या आणि गर्दी विचारात घेता तसे नियोजन सोपे वाटत असेलही; परंतु शाहीस्नानातील चेंगराचेंगरीचे प्रकार पाहता कुंभवर्षात शाहीस्नानाचे आणि अन्य स्थानाचे दिवस लक्षात घेऊन किती लोकांनी त्या काळात कुंभाला यावे, याचे नियोजन करणे शक्य आहे का, याचा विचार करायला हवा.
प्रयागराजचा मुख्य प्रवेशबिंदू असलेल्या नागवासुकी मंदिराजवळ गर्दीचा ताण कमालीचा वाढला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संगमकडे जाणारा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला होता. जमाव वारंवार एंट्री पॉईंट ओलांडण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलिसांकडून फटकारल्यानंतर लोक परत येत होते. अशा वेळी पोलिसांकडे सर्व गर्दीपर्यंत योग्य संदेश देण्याची यंत्रणा नव्हती का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या गोंधळामुळे अनेक वेळा लहानमोठ्या चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या. काही महिला आणि वयोवृद्ध लोक गर्दीच्या रेट्यामुळे पडले; मात्र त्यांना वेळीच उचलण्यात आले. वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सुरक्षा कर्मचारी भाविकांना ‘संगमाला या मार्गाने जाता येणार नाही. अन्य मार्गाने जा’ हे एकच उत्तर देत. वास्तविक, रात्री उशिरा नागवासुकी पॉइंट अचानक बंद करण्याचे कारण म्हणजे संगमावरील गर्दी लक्षणीयरीत्या वाढली होती. इथे हीच परिस्थिती असेल, तर संगमात काय होणार? नागवासुकी मंदिर हे कुंभनगरचा एक अतिशय महत्त्वाचा प्रवेशबिंदू आहे. अर्ध्याहून अधिक शहरवासींयाव्यतिरिक्त, कुंडा, प्रतापगढ, जौनपूर, फाफामौ, उंचाहार, रायबरेली आणि अगदी लखनऊ यांसारख्या जवळपासच्या जिल्ह्यांमधील भाविक येथे दाखल होतात. रात्री येथे बॅरिकेडिंग करण्यात आले असताना लाखो भाविक या रस्त्यावरून संगमाकडे जाण्यासाठी वारंवार दबाव आणत होते.
ही परिस्थिती बघता जणू माणसांच्या महासागराच्या उंच लाटा ढवळून निघाल्यासारखे वाटत होते. ही परिस्थिती पाहिल्यानंतर मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले, की इथे ही परिस्थिती असेल तर संगमाचे काय होईल? नागवासुकी मार्ग बंद केला, तरी जमाव ते मान्य करायला तयार नव्हता. भाविक नागवासुकी मंदिराच्या प्रवेशबिंदूवरून परत आले, तेव्हा ते संगमाला जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाच्या शोधात दारागंज परिसर आणि त्याच्या रस्त्यावर प्रवेश करू लागले. दारागंजचा प्रत्येक रस्ता भाविकांनी फुलून गेला होता. सर्वांना फक्त संगमाकडे जायचे होते. स्थानिक लोकांना संगमाचा पत्ता विचारत होते. अनेक स्थानिकांनी भाविकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि जवळच्या कोणत्याही गंगा घाटावर स्नान करण्यास सांगितले; परंतु बहुतेकांनी स्नान संगमावरच करणार, असा पवित्रा घेतला. त्यांच्या आग्रहामुळे संगमावर सतत दबाव वाढत होता. दुसरीकडे, रात्री उशिरा प्रयागराजचे आयुक्त विजय विश्वास पंत यांनी तेथील भाविकांना आवाहन करून चेंगराचेंगरीची भीती व्यक्त केली होती. कारण, अनेक भाविकांनी संगम नाक्याला वेढा घातला होता आणि तिथेच विसावा घेत झोपले होते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
चेंगराचेंगरी झाली तेव्हा लोक पळू लागले. या वेळी अनेक लोक तेथे जमिनीवर झोपले होते. अशा स्थितीत पाय अडकल्याने अनेकजण पडले. मागून लोक त्यांना तुडवत गेले. त्यात एवढी मोठी घटना घडूनही चेंगराचेंगरीत किती लोक ठार झाले, हे 17 तास प्रशासनाने जाहीर केले नाही. या घटनेत बेपत्ता झालेल्यांची संख्या जास्त होती. देश-विदेशातून मौनी अमावस्येचे स्नान करण्यासाठी गर्दी जमली होती. चेंगराचेंगरीमध्ये काहींचे मोबाईल, कागदपत्रे हरवली. काही बेशुद्ध होते. त्यांच्यापर्यंत संपर्क कसा करायचा, याची चिंता नातेवाईकांना लागली होती. कुठे आणि किती गर्दी जमू द्यायची, याचे अधिकार सरकारकडे असतात. कुणीही कितीही लोकप्रिय असो; पण या व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होऊ शकत असेल, तर अशा गर्दी जमवण्याला नकार देण्याचा सरकारला पूर्ण अधिकार होता; पण तसे न करता एवढ्या लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सरकारने उचलली आणि त्यात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे नाहक जीव गेले. संगम नाक्यावर स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग नव्हते. लोक ज्या मार्गाने येत होते, त्याच मार्गाने परत जात होते. अशा परिस्थितीत चेंगराचेंगरी झाली, तेव्हा सुटकेची संधीच उरली नाही. ते एकमेकांवर पडत राहिले. चेंगराचेंगरी सुरू असताना काही महिला जमिनीवर पडल्या. त्यांना चिरडून लोक पुढे गेले. जमाव पांगल्यावर लोक मृतदेहांमध्ये आपल्या प्रियजनांना शोधत राहिले.
अमृतस्नानापूर्वी बहुतांश पूल बंद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत लोकांनी जीव वाचवण्यासाठी पुलावरून उड्या मारायला सुरुवात केली. जीव वाचवण्याच्या प्रयत्नातच अनेकांचे जीव गेले. प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रयागराजला जाणारे भदोही, चित्रकूट, कौशाम्बी, फतेहपूर, प्रतापगड, जौनपूर, मिर्झापूर हे आठ प्रवेशबिंदू सीमा बंद करण्यात आल्या. संपूर्ण जत्रेचा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व वाहनांचे पास रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मेळ्यात एकही वाहन धावू शकणार नाही. रस्ता एकेरी करण्यात आला आहे. एका मार्गावरून येणाऱ्या भाविकांना स्नान केल्यानंतर दुसऱ्या मार्गावरून पाठवले जात आहे. शहरात चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. हीच व्यवस्था अगोदर करता आली नसती का, असा सवाल आता समोर उभा राहिला आहे.