महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना
राजेंद्र साळसकर
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी शासकीय जमीन ठरली होती त्याचा नवीन शासन निर्णय काढावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाने प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवर महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना महत्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी या रुग्णालयांत यावे लागते. परंतु येथे सोयी-सुविधांची वाणवा असल्याने येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न्यावे लागते. याची दखल घेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडला २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली होती. तसेच तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहारही केला होता.
त्यानुसार ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास शासनाने मंजुरी दिली व २८ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला. तसेच १४७ कोटींच्या या कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. केंबुर्ली येथील स. नं. ५२/२ व ५३/२ अ मधील १५ एकर जमिनीचा ताबा देण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र या जमिनीऐवजी स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयासाठी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना पाठवला होता. असे असताना स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय का काढला? असा सवाल करत महसूल मंत्र्यांकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार आज याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली व महसूल मंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शासकीय जमीन देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा, असा सूचना संबंधित विभागाला दिल्या. या बैठकीला प्रविण दरेकर, महाड १९४ भाजपा विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.