कोणतेही शुभकार्य म्हटले की सर्वप्रथम पूजन केले जाते ते श्री गणेशाचे. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी आहे त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कोणीतीही देवता कार्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. श्री गणेशाने दिशा मोकळ्या कराव्यात तसेच शुभकार्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते. केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर अनेक पंथांमध्ये कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन केले जाते. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच श्री गणेश प्रिय आहे. महाराष्ट्रात तर सर्वात मोठा उत्सव हा श्री गणेशाचाच असतो. भाद्रपद मासातील गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मातीची मूर्ती घरी आणून तिची घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात. दीड, तीन, पाच, सात किंवा दहा दिवस बाप्पाची सकाळी आणि सायंकाळी पूजा-आरती करून बाप्पाला प्रतिदिन वेगवेगळ्या पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. सप्तमीला श्री गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरीचे आगमन होते. अष्टमीला गौरीपूजन केल्यानंतर नवमीला गौरीसोबत श्रीगणेशालाही निरोप दिला जातो. सर्वांचाच लाडका असलेल्या बाप्पाच्या या सणाला पौराणिक कथेचा आधार आहे. गेल्या काही वर्षांपासून माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशीही काही जण घरी श्रीगणेशाची मूर्ती घरी आणून तिचे पूजन करू लागले आहे. काही ठिकाणी तर माघ महिन्यातही गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे होऊ लागले आहेत. ही संख्या वर्षागणिक वाढत आहे. श्रीगणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश मूर्ती घरी आणण्यामागे कोणतीही कथा किंवा शास्त्र यांचा आधार नसला, तरी मनुष्य मुळातच उत्सवप्रिय प्राणी असल्याने त्याला उत्सव साजरे करण्यासाठी केवळ एखादे निमित्त पुरेसे असते. माघी गणेश जयंतीनिमित्त घरी बसवले जाणारे गणपती याचाच भाग आहे.
श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. श्रीगणेशाच्या जन्माची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. माता पार्वतीने स्नानासाठी जाताना शरीराच्या मळापासून बाळ तयार केले आणि सिद्धीद्वारे त्यामध्ये प्राण टाकले. या बाळाच्या हाती तिने दंड दिला आणि आईचे स्नान होईपर्यंत कुणालाही आत सोडू नकोस असे बजावून ती स्नानासाठी गेली. जेव्हा भगवान शिव कैलासावर आले तेव्हा ते माता पार्वतीच्या कक्षात जाण्यासाठी निघाले. त्याच क्षणी गणेशाने त्यांना अडवले. शिवांनी त्यांना आपली ओळख सांगूनही मातेची आज्ञा कुणालाही आत न पाठवण्याची असल्याने त्याने शिवांना आत सोडले नाही. शिव आपल्या स्थानावर गेले आणि त्यांनी नंदी सह गणांना गणेशाची समजूत काढण्यासाठी गणेशाकडे पाठवले; मात्र गणेशाने या सर्वांनाच मार देऊन पिटाळले. गणेशाच्या या कृतीने क्रोधीत झालेल्या शिवांनी अखेर त्रिशूल सोडून गणेशाचे शीर धडावेगळे केले. ही बातमी माता पार्वतींना कळताच त्यांनी रौद्ररूप धारण केले. त्यांना शांत नाही केले तर पृथ्वीचा विनाश होंणार हे निश्चित होते. गणांसह देवादिकांनी त्यांची समजूत काढल्यावर त्या शांत झाल्या; मात्र श्री गणेशाला पुनर्जीवित करण्याची अट त्यांनी घातली. यानुसार शिवांनी इंद्रासह देवांना जंगलात उत्तर दिशेला पाठवले आणि सर्वप्रथम जो प्राणी दिसेल त्याचे शीर आणण्यास सांगितले. पुष्कळ शोध घेतल्यानंतर त्यांना एक हत्ती दृष्टीस पडतो. हा हत्ती म्हणजे गजासुर होता ज्याने शिवाची प्रचंड भक्ती करून त्यांना प्रसन्न केले होते. शिव कायमस्वरूपी आपल्या सोबत राहावेत अशी त्याची इच्छा होती. श्री गणेशाची शीर हवे आहे कळले तेव्हा त्याने देवादिकांना आपले शीर घेण्याची विनंती केली. गजासुर हा महाज्ञानी होता. श्री गणेशाच्या माध्यमातून त्याला सदैव शिवांजवळ राहता येणार असल्याने तो आनंदी होता. गजासुरचे शीर गणेशाला लावण्यात आले. शिवांनी देहाला जिवंत गेले आणि गजाननाचा जन्म झाला. कोणत्याही कार्यात श्रीगणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाईल असा शिवांनी गणेशाला वर दिला.
पार्वतीने तयार केलेला गणेश महापराक्रमी होता. सामर्थ्याला म्हणजेच शक्तीला सात्त्विकतेची, म्हणजेच शिवाची जोड नसेल, तर सामर्थ्याचा अहंकार वाढतो. तो सर्वदा विनाशकारी असतो. त्याव्यतिरिक्त हा पुत्र आपली आज्ञा मानणारा असावा, असाही त्याच्या जन्माच्या वेळी पार्वतीचा एक स्वार्थी विचार असतो. स्वार्थी वृत्तीने केलेली कलाकृती सात्त्विकतेपासून दूर जाते. त्यामुळे मातेचे आज्ञापालन करतांना गणेश सारासार विवेकाच्या मर्यादा उल्लंघतो. करुणा, दया, क्षमा यांचे भान उरत नाही. रज-तम गुणांकडे झुकणारी ही शक्ती तमोगुणी अधिक होते. गणेशाच्या संदर्भातही असेच झाले होते. आदिशक्तीच्या मळापासून बनलेल्या गणेशाची शक्ती अफाट होती; परंतु बुद्धी मात्र मलिन, रज-तमोगुणी होती. वास्तविक हा पार्वतीनंदन विश्वाच्या कल्याणासाठी, ते मंगलमय करण्यासाठी अवतीर्ण झाला होता; परंतु ‘अशी मलिन बुद्धी जगाचे कल्याण नव्हे, तर अकल्याणच करणार’, हे त्रिकालज्ञानी शिवाने जाणले होते. आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराने अन्याय करणार्या पुत्रामुळे जगाचे भवितव्य अंधकारमय होऊ नये, यासाठी त्याची मलिन बुद्धी जाणे आवश्यकच होते आणि ती घालवण्यासाठीच मलिन बुद्धी असलेले त्याचे शिर धडावेगळे करण्याचा निर्णय शिवांना घ्यावा लागतो. धन्य ते पिता, जे जगत्कल्याणासाठी पुत्राचे शिर धडावेगळे करण्याशी मागे पुढे पाहत नाहीत. (आधार : सनातन डॉट ऑर्ग)घ्घ्