सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला सुवर्ण
रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या सुरु झालेल्या स्पर्धेत आज पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा बबन दानोले हिने सुवर्णपदक पटकावले. रुद्रपूर येथे आजपासून सुरु झालेल्या रोड सायकलिंग खेळाच्या महिलांच्या ३० टाईम ट्रायल प्रकारात पूजा दानोले हिने ४५ मि. ३३.७३४ से. वेळ देत भारतामधील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना मागे टाकत महाराष्ट्राला सायकलिंगमधील पहिले पदक मिळवून दिले.
रुद्रपूर ते पंतनगर रोडवरील १५ किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा पार पडल्या. मूळची कोल्हापूरची असलेल्या पूजाने सायकलिंग खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या कडे घेतले. नवी दिल्ली येथील सिएफआय आणि साई यांच्या संयुक्त अकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेतले. पूजाने रोड, एमटीबी आणि ट्रॅक या तीनही प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध केले असून सध्या रोड आणि ट्रॅकवर तीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
या स्पर्धेतील रौप्य पदक मोनिका जाट हिने ४५ मि. ४८.३५१ से. देत जिंकले तर कर्नाटकच्या शिवलिंग हिला ४५ मि. ५१.५९४ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रुद्रपूर येथे सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धा संचालक प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील, प्रशिक्षक उत्तम नाळे आदी मान्यवरांनी भेटून कौतुक आणि अभिनंदन केले.
या स्पर्धेचा पदक प्रदान समारंभ रुद्रपूरचे जिल्हाधिकारी मा. नितीन भडोदीया यांच्या आणि सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे महासचिव आणि जीटीसीसी चे सदस्य मनेंदर पाल सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला
0000
0000