खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र दोन सुवर्ण पदकांपासून एक पाऊल दूर
उपांत्य फेरीत दिल्ली व प. बंगालवर दणदणीत विजय
हल्दवानी : उत्तराखंडच्या हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दमदार प्रदर्शन करत अनुक्रमे दिल्ली व पश्चिम बंगालवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिला गट: दिल्लीवर सहज विजय
महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीत दिल्लीचा एक डाव आणि ८ गुणांनी (२४-१६) पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे (२.४० मिनिटे संरक्षण, ६ गुण), अश्विनी शिंदे (२.४० मिनिटे संरक्षण), संपदा मोरे (२.३० मिनिटे संरक्षण), गौरी शिंदे (२ मिनिटे संरक्षण), रेश्मा राठोड (१.४० व १.२० मिनिटे संरक्षण, २ गुण), संध्या सुरवसे (२ मिनिटे संरक्षण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली संघाकडून लक्ष्मी ओझा (१.४० मिनिटे संरक्षण, २ गुण) आणि बबिता (६ गुण) यांनी चांगला खेळ केला, मात्र संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.
पुरुष गट: पश्चिम बंगालवर मोठा विजय
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत पश्चिम बंगालचा १० गुणांनी (३२-२२) पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात शुभम थोरात (१.४० व २ मिनिटे संरक्षण, ६ गुण), रामजी कश्यप (१.५० व २.१० मिनिटे संरक्षण, ४ गुण), सुयश गरगटे (२ मिनिटे संरक्षण, ६ गुण), सौरभ आडावकर (१.५० मिनिटे संरक्षण, ६ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पश्चिम बंगालकडून कर्णधार सुमन बर्मन (१.४० मिनिटे संरक्षण), सुभाशिस (१.२० मिनिटे संरक्षण, ४ गुण) आणि अनुकूल सरकार (६ गुण) यांनी कडवी झुंज दिली, पण महाराष्ट्राच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा प्रतिकार अपुरा ठरला.
सुवर्णपदकाच्या दिशेने महाराष्ट्राची मजल!
महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करत सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता दोन्ही संघांकडून अंतिम सामन्यातही अशाच दमदार खेळीची अपेक्षा आहे.