Month: January 2025

प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा

समर चव्हाण विजेता मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले. सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकुण पाच फेऱ्यात समरने एक सामना अनिर्णित राखत साडे चार गुणांची कमाई केली होती. पण अमोघ शर्मानेही तितक्याच गुणांची कमाई केल्याने टायब्रेक झाला. यावेळी सरस गुणगतीच्या आधारे विजेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. त्यात १३.२५ विरुध्द १२.७५ अशा अवघ्या ०.५० फरकाच्या गुणांनी समर चव्हाण याने बाजी मारली. अमोघला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर चार गुणांसहीत अदिश गावडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्या समर चव्हाणला कै. सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ अडीच हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर अमोघ शर्माला कै. नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिड हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकावरील आदिश गावडे याला कै. सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडे या खेळाडूला यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजकल शरद पाठक आणि गणेश गावडे उपस्थित होते. प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू डावीकडून युवान तावडे, विजेता समर चव्हाण, प्रमुख पाहुणे राजन पिंगळे, उपविजेता अमोघ शर्मा आणि तृतिक क्रमांक विजेता आदिश गावडे.

देशाचे संविधान बदलणार ही ‌भिती व्यर्थ!तसे झाले‌‌ तर देश रस्त्यावर उतरेल!-अॅड.वालावलकर

राजेंद्र साळसकर मुंबई : देशाचे संविधान बदलणार ही भिती व्यर्थ आहे.संविधान बदलने इतके सोपे नाही आणि जर‌ तसे झाले तर त्याविरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे वकिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अमृतमहोत्सवी वर्षांची वाटचाल,यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या परळ येथील आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने रविवारी प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या‌ औचित्याने २५ वकीलांचा,परळगाव, लालओठा मैदानावरील सुसज्ज शामियान्यात गुणगौरव सोहळा पार पडला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.नरेंद्र‌ वालावलकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या वकीलांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन‌ गुणगौरव‌ करण्यात आला.सत्कारात महिला वकिलांचाही समावेश होता‌. त्यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर आपल्या भाषणात पुढेम्हणाले,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य आणि अधिकार या गोष्टी बहाल करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संकुचित होता कामा नये,त्याचे संरक्षण करण्याची शिकवण देणारा प्रजासत्ताकदिन आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कोल्हापूरे होते. मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस विजय परदेशी म्हणाले,हे डॉक्टर,वकील‌ यांचा ते‌ पेशा बजावत असले‌ तरी,ते विविध समाजाची‌ बांधिलकी निभावत असतात.त्याची सामाजिक संस्थांनी उचित अशी दखल‌ घेणे‌,ही त्यांची नैतिक जबाबदारी असते.तीच जबाबदारी जोपासण्याचे‌ काम आम्ही करीत आहोत.याप्रसंगी स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली. या प्रसंगी परळगावातील‌‌ लेखक काशिनाथ माटल यांच्या लेखणीची ओळख करून देताना विजय परदेशी म्हणाले, काशिनाथ माटल यांनी पाच वाचनीय आणि उत्कृष्ट कथासंग्रह ‌लिहून परळकरांना अभिमान संपादून दिला आहे. त्यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचा दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे,त्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात‌ आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते‌.

स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारा गिरणी कामगार मुंबईच्या हद्दपार होता कामा नये!

ध्वजारोहण प्रसंगी सचिन अहिर यांचे प्रतिपादन राजेंद्र साळसकर मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या त्यागमयी योगदानाने इतिहास रचणारा गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर मुंबई पासून हद्दपार होता कामा नये,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहण प्रसंगी गिरणी कामगारांपुढे बोलताना दिली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने‌‌ परेलच्या मजदूर मंझील मधील प्रांगणात, देशाच्या ७६ व्या‌ प्रजासत्ताकदिनी अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले‌‌.त्यावेळी गिरणी कामगारांपुढे बोलताना आमदार सचिन आहिर पुढे म्हणाले, गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या तसेच गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर आपण अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाद्वारे‌ भेट घेतली आहे. त्यांनी या प्रश्नावर लवकरच संबंधिता समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे,असे सांगून श्री अहिर म्हणाले,कोविडचे कारण पुढे करून मुंबईसह राज्यातील एनटीसीच्या गिरण्या गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.केंद्र सरकारकडून या गिरण्या पुर्ववत चालविल्या जात‌ नाहीत किंवा गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना पगारही देण्यात आलेला‌ नाही.तेव्हा स्वातंत्र्य लढ्यातील गिरणी कामगारांच्या योगदानाचा सरकारला विसर पडला समजायचा का? या प्रश्नावर खासदारां‌ समवेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेट घेण्यात येणार आहे. ‌‌स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दणा-या शूर‌ विरांच्या‌ आत्मबलीदा नातून‌,तसेच महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,मौलाना आझाद यांच्या सारख्या अनेक देशभक्तांच्या लढ्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले,हा खरा स्वतंत्र लढ्याचा जाज्वल्य इतिहास आहे.परंतु काही तथाकथित चित्रपट कलाकार,देशाला गेल्या दहा वर्षांपासून ख-या अर्थाने स्वतंत्र्य मिळाले,अशी मुक्ताफळे उधळत आहेत.स्वातंत्र्या‌नंतर ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशाने अंतराळ संशोधनात बाजी मारली,अन्न-धान्यात‌ मजल मारली,‌असे अनेक अंगाने‌‌ देशाला मिळवून देण्यात आलेले बहुआयामी यश‌ कदापि विसरता येणार नाही. स्वातंत्र्याबरोबरच थोर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिले,त्यामुळेच देश‌ आज एकसंघ राहिला आहे. तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारताचे संविधान सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल.देशाने आपल्याला काय दिले या पेक्षा,आपण देशाला काय देणार ?याची तयारी आता सर्वांना ठेवावी लागेल,असेही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.त्या प्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि अन्य पदाधिका री उपस्थित होते.संघटनेच्या सेवादल विभागाने ध्वज संचलनात महत्वाचे सहकार्य केले.

मूत्र असंयम आजारावर अपोलोचे यशस्वी उपचार

रमेश औताडे मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आग्नेय आफ्रिकेतील एक देश मोझाम्बिकहुन आलेल्या ४० वर्षे वयाच्या महिलेच्या मूत्र असंयम (लघवी लीक) आजारावर अपोलो हॉस्पिटल ने यशस्वी उपचार केले . श्रीमती ऍलिस यांना बऱ्याच वर्षांपासून मूत्र असंयमाचा त्रास  होता. या विकाराचा खूप मोठा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला होता, खोकणे किंवा शिंकणे यासारख्या सामान्य क्रिया देखील खूप आव्हानात्मक बनल्या होत्या. मूत्र असंयम ही एक सर्रास आढळून येणारी समस्या आहे पण तरीही गैरसमजुती, सामाजिक कलंक आणि त्यावरील उपचारांविषयी जागरूकतेचा अभाव त्यामुळे बहुतांश वेळा ही समस्या दुर्लक्षिली जाते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने महिलांना आवाहन केले आहे की, असे त्रास होत असतील तर गप्प राहू नका, पुढे या, बोला आणि टीओटी सर्जरीसारख्या मिनिमली इन्व्हेसिव पर्यायांची माहिती करून घ्या. हे उपचार तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देऊ शकतात. डॉ हिमानी शर्मा, सिनियर कन्सल्टन्ट-ऑब्स्टट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी उपचार करण्याचे महत्त्व समजावून सांगताना त्या म्हणाल्या,”मूत्र असंयम ही फक्त एक वैद्यकीय स्थिती नाही तर हे एक आव्हान आहे, महिलेच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो.

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे :‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१ हजार ७०४ अर्ज आले आहेत.‌ १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर दि. २ फेब्रुवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.

भांडुप परिमंडलात २२१२ रोहित्र झाले स्वच्छ

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम; १३३ उपकेंद्र, २६५ कार्यालयांचीही साफसफाई ठाणे : भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिमंडलातील रोहित्र (डीपी), उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८९८ कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांनी परिमंडलातील २२१२ रोहित्र, १३३ उपकेंद्र आणि २६५ कार्यालयांची साफसफाई केली. महावितरणच्या या उपक्रमाचे वीज ग्राहकांनी स्वागत व कौतुक केले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आखण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे, नमिता गझदर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल यांच्यसासह ३५ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत भांडुप परिमंडल कार्यालयाची साफसफाई केली. तर ठाणे मंडल कार्यालयांतर्गत भांडुप, मुलूंड, ठाणे शहर एक आणि दोन, वागळे इस्टेट विभागात ४५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १३८७ रोहित्र, ४७ उपकेंद्र आणि ६१ कार्यालयांची स्वच्छता केली. वाशी मंडल कार्यालयातील नेरुळ, वाशी आणि पनवेल शहर विभागात ५५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०८ रोहित्र, ४८ उपकेंद्र आणि ५५ कार्यालयांमध्ये साफसफाई केली. पेण मंडल कार्यालयांतर्गत अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण विभागातील ८६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७१५ रोहित्र, ३७ उपकेंद्र आणि १४८ कार्यालयांमध्ये स्वच्छता केली. यात रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी हटविण्यात आल्या. याशिवाय वाढलेले गवत रोहित्राच्या सभोवतीचा कचरा साफ करण्यात आला. शहरी भागात विविध सोसायट्यांमधील रोहित्रांच्या स्वच्छतेसोबतच काही ठिकाणी रोहित्र व वितरण पेट्यांना रंगरंगोटीही करण्यात आली. यातून रोहित्र परिसरातील अपघात टाळण्यास व परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत मिळेल. मुख्य अभियंता श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते राजाराम माने, संजय पाटील व युवराज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

शिवसेना उबाठा शिव आरोग्य सेनेच्यावतीने डायलेसीस रुग्णांना औषधे व श्रवणयंत्र वाटप

ठाणे – धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत…

ठामपाचे रेबीजमुक्त ठाणे अभियान

१० हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबिवण्यात येणार आहे. या अभियानात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते. या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण २०३०पर्यंत शुन्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महानगरपालिकेने ७ हजार ४०९ भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबविण्यात येईल. ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी दहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.