Month: January 2025

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित खो खो स्पर्धा

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व…

शेवा गावातील कोळी समाजाचा JNPT विरोधात ऐतिहासिक चॅनेल बंद आंदोलन!

समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई; हा लढा हक्कांसाठी, सन्मानासाठी राज भंडारी पनवेल : उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने ४० वर्षांपासून JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला, कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता.या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून, त्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले. JNPT ने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक , पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. सर्बानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन, पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश कोळी , आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे , पर्यावरणप्रेमी श्री.नंदकुमार पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे, आणि फेडरेशन ऑफ फिशरीजचे मार्शल कोळी, यांनी केले. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी श्री.भरत वाघमारे, एसडीओ पनवेल श्री.पवन चांडक, तसेच जे.एन.पी.टी.चे अध्यक्ष श्री. उन्मेष वाघही उपस्थित होते. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या ४० वर्षांच्या संघर्षकथांना ऐकून स्तब्ध झाले आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे शब्द दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. सदरील चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहपोलीस आयुक्त श्री. संजय येनपुरे साहेब, उपायुक्त श्री. प्रशांत मोहिते साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत साहेब यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता सुरेश दामोदर कोळी (अध्यक्ष,हनुमान – शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ, रमेश भास्कर कोळी ( अध्यक्ष, पारंपारिक मच्छिमार संघटना ), परमानंद कोळी ( मा. सरपंच हनुमान कोळीवाडा ), मंगेश अनंत कोळी ( उपाध्यक्ष ), हरेश महादेव कोळी, नितीन महादेव कोळी, उज्वला रमेश कोळी ( अध्यक्ष, विस्थापित महिला संघटना ), कल्याणी कोळी ( उपाध्यक्ष ), जगदीश जनार्दन शेवेकर, प्रकाश नाखवा यांनी खूप मेहनत घेतली.

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

ठाणे : 25 जानेवारीला 15 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा असल्याने त्यानुषंगाने 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सामुहिक मतदान शपथ घेण्यात आली. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावावा व मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी – कर्मचारी आदी उपस्थित होते. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” ही सामुहिक शपथ यावेळी घेण्यात आली.

नवी मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन संपन्न

शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांचा सहभाग अनिल ठाणेकर महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावरील राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले यात शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांनी आपला सहभाग नोंदविला होता. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. या संमेलनाने शिक्षण अभ्यासक, कलाकार, पत्रकार आणि विद्यार्थी यांना एकत्र आणले. तसेच एकोपा आणि कॅम्पस लोकशाहीसाठी एकत्र येण्याचा संकल्प केला. या संमेलनात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (आयआयटी बॉम्बे), मुंबई विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस), अमेठी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, यांच्यासह महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कॅम्पस लोकशाही’ या विषयावरील पॅनेलमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना, प्रा. आर. रामकुमार यांनी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या अभिव्यक्तीवर येणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीची गरज व्यक्त केली. जेएनयू विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष आईशी घोष यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सह भारतीय विद्यापीठांच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष चारित्र्याशी थेट तडजोड करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पॅनेलचे अध्यक्षपद भूषवताना लेखक डॉ. नितीश नारायणन यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची उदाहरणे मांडली. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या सर्वसमावेशक कॅम्पस लोकशाहीसाठी आणि त्यांच्या आवाजासाठी परिसरात जागा निर्माण केली, त्यांचे कौतुक केले. सुप्रसिद्ध संगीतकार शाहीर संभाजी भगत यांनी ‘आर्टिस्ट्स फॉर हार्मनी ॲण्ड बियॉन्ड’ या पॅनेलला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणावर आणि सांस्कृतिक-राजकीयदृष्ट्या एकता आणि लोकशाहीची हाक देण्याची गरज याविषयी माहिती देऊन समृद्ध केले. कलाकार व विद्यार्थी नेत्या दिपसिता धर यांनी समरसता आणि विविधतेचा संदेश देण्यासाठी चित्रपट आणि संगीताच्या मुख्य प्रवाहातील मंचचा वापर करण्याचे आवाहन केले. तर अध्यक्ष सृजन भट्टाचार्य यांनीही मोठ्या लोकांपर्यंत राजकीय संदेश पोहोचवण्यासाठी कला आणि कलाकारांचे महत्त्व ओळखले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने राज्यव्यापी ‘एकता प्रश्नमंजुषा’ आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विजेत्यांना आकर्षक पारितोषिक रकमेसह इतर आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या संमेलनात सफदर हाश्मी मेमोरियल ट्रस्ट (सहमत) द्वारे ‘विवादाच्या पलीकडे: लँडस्केप्स ऑफ डिसेंट’ हे कला प्रदर्शन देखील प्रदर्शित करण्यात आले. ज्याचे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार उत्तम घोष यांनी केले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात लोक सांस्कृतिक मंच, मुंबई यांचे सांस्कृतिक सादरीकरण झाले. टीआयएसएस आणि जय भीम नगर, मुंबई येथील विद्यार्थ्यांनीही संमेलनामधील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमस्थळी प्रगतीशील साहित्य आणि चळवळीच्या इतर साहित्याचे स्टॉल लावण्यात आले. एसएफआयचे महासचिव मयुख बिस्वास आणि राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू हेही विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाचा समारोप करताना, स्टुडंट्स फॉर डेमोक्रसीच्या वतीने रोहिदास जाधव आणि रामदास प्रिनी शिवानंदन यांनी समरसता आणि कॅम्पस लोकशाहीसाठी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. द्वेष आणि जातीयवादाच्या राजकारणाविरोधात विद्यार्थी वर्गाला एकत्र आणण्यासाठी आणि कॅम्पस लोकशाहीसाठी विद्यार्थी संघटनांना एकत्र करण्यासाठी असे कार्यक्रम आणि मेळावे महाराष्ट्रभर सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्टुडंट्स फॉर डेमोक्रसी इतर सर्व संस्था आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्ये असलेल्या व्यक्तींनाही समरसतेचा आणि कॅम्पस लोकशाहीचा संदेश देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ & रामदास प्रिनी शिवनंदन या एकता एक्सप्रेस @ मुंबई आयोजन समितीने केले आहे.

‘निवृत्तीनंतरच्या समाजकार्यात तुमची साथ महत्वाची’

ठाणे : निवृत्तीनंतर आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा समाजाला व्हावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम  राबवताना गेली २९ वर्षे तुम्हीं दिलेल्या साथीमुळेच ते शक्य झाले, त्यामुळे तुम्हीं होतात म्हणून मी आहे असे भावपूर्ण मनोगत ७५ वर्षीय अनंत कदम यांनी व्यक्त केले. कुठल्याही कर्मचाऱ्याला निवृत्ती, बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती हे नवीन नाही. पण वरील गोष्टीमुळे निंर्माण होणार दुरावा  वार्षिक स्नेहसंमेलनतून  निघून जावा म्हणून बँक ऑफ इंडियाच्या काळबा देवी शाखेने १९९६ साली हा उपक्रम सुरु केला. यंदा या मित्र मेळाव्याचे २९ वे वर्ष होते. पहिल्या वर्षांपासून अनंत कदम हे या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आले आहेत. सुरुवातीला स्नेहसंमेलनाचे स्वरूप असलेल्या या मित्र मेळाव्याला मागील काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली. सुरुवातीच्या काळापासून मित्र मेळाव्यात सहभागी होणाऱ्या १०६ अधिकारी,कर्मचाऱ्यांना देवाज्ञा झाली. यावर्षी ५५ महिला आणि पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गतवर्षी दिवंगत झालेल्या १० सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ८० वर्षीय अविनाश दांडेकर, शरद हर्डीकर, प्रल्हाद नाखवा, सहाय्यक व्यवस्थापक सतीश प्रभू यांनी वेगवेगळ्या उपक्रमाचा आढावा घेत आठवणीना उजाळा दिला  नायर सभागृहात झालेल्या या मित्र मेळाव्यात मुंबई मॅरेथॉनमधील  ४.५ किलोमीटर अंतराची वॉकथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ७५ वर्षीय बलराम मेनन यांना यावेळी गौरवण्यात आले.शंकर नांदोस्कर ( जय गंगे भगिरथी ),  अश्विनी राणे (संय्या मिलके जाना रे), सुलभ अय्यर (एका तळ्यात होती बदके साथ ), यक्षा धुलधोया (जीना इसिका नाम है ) यांनी स्वरमैफलित रंग भरले. सतीश प्रभू यांनी आभार प्रदर्शन करताना पुढील वर्षी ३० वे वर्षे  साजरे करताना वेगळे उपक्रम घेऊन अनंत कदम आणि छायाचित्रकार नरु शहा तयार असतील असे सांगितले.

वींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ माजी शिक्षक ठाणे : कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव अन वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेले मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रवींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव शाळेने 18 जानेवारी 2025 रोजी शाळेत आयोजित केला होता. आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, पुढाकार घेऊन हा सोहळा करणे म्हणजे एका कर्मयोगी शिक्षकांच्या जीवन प्रवासातील तो अत्युच्च आनंदाचा क्षण ठरावा. मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सरांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, माजी शिक्षक गणेश पेंडसे, सुबोध देशपांडे व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या सुवर्णक्षणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमा केलेल्या निधीतून शाळेत अधिक दोन सौर ऊर्जा पॅनल चे उद्घाटन रवींद्र कृष्णाजी तामरस सरांच्या हस्ते केले. सरांच्या कार्याची, कर्तृत्वाची, अखंड सेवेची दखल उपस्थित प्रत्येकाने घेतली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्या प्रामाणिकपणाच्या निरलस सेवेचे भरभरून कौतुक केले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी मी घडलो तामरस सरांमुळे असे गौरवपर पत्र पाठवले. विविध क्षेत्रांतील उच्च पदावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तामरस सरांच्या मनोगतातून बालपणापासून ते वयाच्या 75 पर्यंतचा चढता आलेख ऐकून सरांच्या अचाट आणि अफाट स्मरणशक्तीचे सभागृहाने कौतुक केले. अत्यानंदाची बाब म्हणजे एरवी गौरवमूर्तीला भेटवस्तू म्हणून धनादेश दिला जातो उलट इथे मात्र तामरस सरांनीच मुख्याध्यापकांकडे दीड लाखाचा धनादेश सुपूर्द केला. गुरुवर्य कै. अक्षीकर, एस. व्ही. कुलकर्णी, कै. चितळे सर यांच्या संस्कारांमुळे, प्रेरणेमुळेच घडल्याचे सरांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ही त्यांनी कौतुक केले अशा हृदय सोहळ्याचे सुवर्णक्षण अनेकांनी आपल्या मनात आणि कानात साठवून ठेवले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व सहकारी शिक्षिका स्नेहा शेडगे यांनी केले.

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी १०%  जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार, असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी दिला. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात रिपाइंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे,  ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड,  प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड,  ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, साहेबराव सुरवाडे, निरीक्षक प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते. बारसिंगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात  महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्याकडून केलेली मेहनत आहे. मात्र, आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही बारसिंगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च काढण्यात येत आहे. या मोर्चात रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात 21 जानेवारी अखेर या योजनेत एकूण 1,00,700 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 392 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना 783 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले.  21 जानेवारीला एका दिवसात 1195 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले. राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे (7931 घरे), जळगाव (7514 घरे), छत्रपती संभाजीनगर (7008 घरे), नाशिक (6626 घरे), अमरावती (5795 घरे) आणि कोल्हापूर (5024 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना…

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, नाटक, गायन अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी स्नेहसंमेलनात साकेत ज्ञानपीठचे सी.ई.ओ.  शोभा नायर , प्रमोद राम उजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ.सनोज कुमार, साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. वसंत भऱ्हाटे, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य  विद्याप्रकाश मोरया, डॉ. सरोज कुमार, साकेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पिऊली भट्टाचार्य, साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ममता सिंग या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य .नाटक अशा विविध कार्यक्रमांचा सोहळा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

मुंबई : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. ही मदत मिळविण्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’कडे मदतीचा अर्ज करण्याबरोबर, मदतीसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल, अशी माहिती ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स प्राप्त अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास सहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच अर्थसहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे. कारभार कागदविरहित होणार गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चा कारभार कागदविरहित होणार आहे. त्यामुळे हा निधी मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला जोडणार रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) जोडण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे.