Month: January 2025

 घराच्या छतावर वीज निर्मिती करून २४४८ ग्राहक झाले स्वावलंबी

 कल्याण आणि भांडुप परिमंडलात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ   कल्याण :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत. 0000

वकीलावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाट

मुरबाड पोलिसांच्या तपासावर शंका राजीव चंदने मुरबाड : मुरबाड  तालुक्यातील सरळगांव  येथील आंबेडकर चळवळीतील अभ्यासू नामवंत वकील आणि ग्रुप ग्रामपंचायत सरळगावचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय रोकडे यांनी सरळगाव नाक्यावर म्हसा यात्रेकरीता येणा-या लोकांचे स्वागताचा पोस्टर लावत असताना तेथील गुंड प्रवृत्तीचे विष्णु सदाशिव घुडे, वैभव सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे यांनी जातीयद्वेष भावनेतून जातीय वाचक शिवगाळ करत बेदम मारहाण केली.याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी अक्षय घुडे, विष्णू घुडे, वैभव घुडे व इतर ५ ते ६ आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे मुरबाड पोलीस तपास यंत्रणेवर आंबेडकरी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र नव्याने आलेले पोलीस निरीक्षक गिते यांनी आरोपी दोन दिवसात अटक करतो अशा वलग्ना केल्या, माझ्यावर विश्वास ठेवा मात्र त्यांच्या वलग्ना हवेतच विरल्या. त्यामुळे पोलीस देखील आरोपीना पाठीशी घालत आहेत हे उघड झालं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेडकर चळवळीतील नामवंत वकील व ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांनी बाजारपेठेत म्हसा यात्रेतील भाविकांचे स्वागत करण्याचे बॅनर लावण्यासाठी तेथे आले. बॅनर लावत असताना आरोपी अक्षय घुडे यांनी यावर आमदार कथोरे यांचा फोटो आहे. त्यामुळे हा बॅनर लावू नये असा दम दिला. आणि तुमची लायकी नाही, म… समाजाच्या लोकांना बॅनर लावण्यासाठी ही जागा नाही. त्यावर संयम ठेवत ऍड रोकडे यांनी, आम्ही बॅनर बाजूला लावतो, असे सांगत असताना आरोपी विष्णू घुडे,यांनी धावत येत काहीही ऐकून न घेता अक्षय यास मारण्यास सुरवात केली. यावेळी ऍड रोकडे यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ऍड प्रफुल्ल रोकडे यांना देखील जातीय वाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, या मारहाणीत ऍड रोकडे व त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. व मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने तो खाली कोसळला. आरोपी विष्णू, वैभव, अक्षय त्यावरच न थांबता ऍड प्रफुल्ल व भाऊ अक्षय यांना फरफटत नेले. आणि ऍड प्रफुल्ल रोकडे यांचा गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटून त्यांनी मुरबाड पोलीस स्टेशनं गाठले. सदर घटना इतकी गंभीर असताना देखील, आणि पाच सहा दिवस उलटून गेले तरी मुरबाड पोलीस स्टेशनं चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते यांनी कोणतेही ऍक्शन न घेता आरोपीना पाठीशी घातले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आरोपी अटक करतो, काळजी करू नका असे बोलणाऱ्या मुरबाड पी आय गिते यांच्या तपास यंत्रनेवर आंबेडकरी समाजाला संशय निर्माण झाला आहे.येत्या दोन दिवसात आरोपी अटक केले नाहीत तर पोलिसांच्या अपयशाच्या आणि निक्रियतेच्या विरोधात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलनच्या माध्यमातून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत ऍड प्रफुल्ल रोकडे व भाऊ अक्षय रोकडे यांच्या हल्लेखोरांना अटक साठी मागणी करणार आहेत. 0000

नर्सिंग हे मानवतेची सेवा करणारे व्रत

गावित यांचे गौरवोद्गार जी. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा योगेश चांदेकर पालघरः नर्सिंग हा व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचे हे व्रत आहे. जगभरातच सध्या नर्सिंग स्टाफचा तुटवडा असून पालघर येथील ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’ संचलित ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या विद्यार्थ्यांना भारताबरोबरच परदेशातही उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची संधी आहे. ते पालघरचे नाव जगभरात उंचावतील, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या व ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या प्रथम वर्षाच्या जी.एन. एम. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या शपथविधी सोहळ्यात गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उज्वला काळे, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी, सचिव जतिन संखे, उपाध्यक्ष रूपाली गावित, सदस्य रोहित गावित आदी उपस्थित होते. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावित यांनी फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांच्या परिचारिका सेवेच्या व्रताचा पाया तसेच मुंबईतील काशीबाई गणपत या पहिल्या परिचारिकेने आरोग्य सेवेतील दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात पाच हजार एक्केचाळीस मुलाचे मृत्यू कुपोषण आणि पुरेशा उपचाराअभावी झाले. त्याला केवळ आरोग्य विभाग जबाबदार नसून प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि तंत्रज्ञनाचा अभाव हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. माता, बाल मृत्यूचे प्रमाण नाशिक जिल्ह्यातील कळवण, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अमरावती परिसरातील चिखलदरा तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पालघर जिल्ह्यासारखीच स्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांची चूक आहे, तिथे बोलले पाहिजे, त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या पाहिजेत, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेले पुरेसे कर्मचारी मिळत नाही, ही शासनाची अडचण आहे, असे गावित म्हणाले. दक्षिणेतील परिचारिका जगभर दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू या राज्यात परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे. सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीत आहे. त्यामुळे आखाती देशात तसेच आपल्या देशातही विविध ठिकाणच्या रुग्णालयात केरळ आणि तामिळनाडूच्या परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे, असे निदर्शनास आणून गावित म्हणाले, की  आता आपल्याकडे हे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी एकट्या कुटंबात वृद्धांची सेवा करण्यासाठी आता परिचारिकांना मागणी आहे. परिचारिकांची कामगिरी ही केवळ पैशात मोजाली जाणारी नाही, तर त्यापेक्षा खूप महत्त्व आहे. समाजसेवेतील ते एक महत्त्वाचे कार्य आहे. हिरो आणि समाजाची आई! परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून ती सेवाभावाने काम करणारी आई असते. रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सावरण्यास मदत करीत असते. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफ हा खऱ्या अर्थाने समाजाचा ’हिरो’ असतो. समर्पण, मेहनत, कौशल्य हे जर असेल तर कोठेही चांगली नोकरी मिळू शकते. आणि तंत्रज्ञानाच्या बदलाबाबत तुम्ही सातत्याने सतर्क राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा, असा सल्ला गावित यांनी दिला. पालघर आणि राज्याचे नावही ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’चे विद्यार्थी जगात उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही उत्तम संधी या वेळी आमदार तरे म्हणाले, की नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातही नर्सिंग क्षेत्राला उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनाशील, दक्ष, शिस्तप्रिय व समाजसेवी वृत्तीचे असणे महत्त्वाचे आहे. या वेळी बाळासाहेब पाटील यांनीही फ्लॉरेन्स नाईंटिंगेल यांच्या कार्याचा तसेच मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव करताना परिचारिकांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्राला भावी काळातही मोठा वाव आहे असे त्यांनी सांगितले. 00000

कोपरखैरणे विभागातील मुख्य रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबई : सखोल स्वच्छतेव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर देत 30 डिसेंबरपासून 13 जानेवारी पर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सुट्टयांसह सलग 15…

मुंबई पोर्टच्या कलाकार योगिनी दुराफे यांना अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार

मुंबई :टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने  नुकताच  पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत  दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ…

 कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा सादर

Slug – मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक नाशिक : गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे १४ हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केवळ दोन वर्षांचा अवधी बाकी आहे. नियोजनाला विलंब होत असल्याने त्यास गती देण्याकरिता सिंहस्थाची विस्तृत स्वरुपाची बैठक घेण्याचे सुतोवाच कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच नाशिक दौऱ्यात केले होते. त्यानंतर लगोलग ही बैठक होत आहे. सिंहस्थासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्या कार्यरत आहेत. २०१५ मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे २३०० कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा ६९७८ कोटींचा आराखडा सादर केला आहे. आगामी सिंहस्थासाठी तपोवनमध्ये ४०० एकर क्षेत्रात साधुग्रामचे नियोजन असून तीन आखाड्यांचे सुमारे चार लाख साधू-महंत या ठिकाणी वास्तव्यास येण्याचा अंदाज आहे. एका पर्वणीत ८० लाख भाविक शहरात येतील. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेबरोबर त्र्यंबकेश्वर नगरपालिका व अन्य विभागांनी कामांचे नियोजन केले आहे. आगामी कुंभमेळ्यात सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य राहणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. 00000

सानपाड्यात सुयोग समूह परिवारातर्फे व्याख्यानमालेतून जीवन जगण्याचा मूलमंत्र

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८  मधील सुयोग समूह परिवार यांच्या वतीने ” ध्यास समाज प्रबोधनाचा ”  या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून  व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.  त्यानुसार यावर्षी ठाणे विद्यालयाच्या शिक्षिका…

नागरिक केंद्री प्रशासन ही भूमिका ठेवून काम करा – डॉ.कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : यापुढील काळात महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणा-या विविध सेवासुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘महानगरपालिका आपल्या दारी’ सारखा लोकांपर्यंत जाण्याचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देत नागरिककेंद्री प्रशासन ही भूमिका नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने काम करावे असे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले. नवी मुंबईकर नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित सर्व कामे सुलभ व सोप्या पध्दतीने विनासायास व्हावीत याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे विशेष लक्ष देत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यावर भर दिला जात आहे.यामध्ये ‘शून्य प्रलंबितता’ अर्थात ‘झिरो पेन्डसी’ हे सूत्र प्रमाण मानून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या नस्ती, कागदपत्रे यांचे डिजीटलायझेशन करण्याचे सूचित करण्यात आले असून कार्यालयांतील उपलब्ध अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे तसेच शासकीय नियमानुसार अ, ब, क, ड कागदपत्रे स्वरूपात वर्गीकरण करणे याबाबत मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच विहित कालावधीनंतर नष्ट करावयाची कागदपत्रे यांचे निर्लेखन करून ते नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी तसेच जतन करून ठेवावयाचा अभिलेख वर्गवारीनुसार स्वतंत्ररित्या जतन करण्यासाठी मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविण्याची कार्यवाही करण्याचीही प्रक्रिया जलद पूर्ण करून घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.सर्व कार्यालयांत अंतर्गत स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. त्यासोबतच जुन्या फर्निचरची योग्य रितीने विल्हेवाट लावावी असे सूचित करतानाच कार्यालय परिसराचीही स्वच्छता करावी व नीटनेटकेपणावर भर द्यावा तसेच अभ्यागत कक्षाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.कार्यालयांमध्ये कर्मचारी व नागरिकांसाठी स्वच्छ व शुध्द पिण्याची पाणी व्यवस्था व स्वच्छ प्रसाधनगृह व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित करभरणा करणे अथवा इतर कामे सहजपणे व विहित वेळेत व्हावीत यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क रहावे असे सूचित करीत अधिका-यांनी नागरिकांना कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करावी, ती ठळकपणे प्रदर्शित करावी व त्या वेळेत नागरिकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.नागरिकांना विविध लोकसेवा पुरविणारी सर्व विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रे तत्पर असावीत, त्याठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असे सूचित करीत नागरिकांना महापालिकेची वेबसाईट तसेच My NMMC ॲपव्दारे मोबाईलच्या एका क्लिकवर करभरणा करण्यापासून एखाद्या समस्येविषयी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमव्दारे तक्रार दाखल करण्यापर्यंत सर्व सुविधा घरबसल्या उपलब्ध आहेत याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेची बचत करण्यासाठी महानगरपालिका विविध ऑनलाईन सुविधा देऊन तत्पर आहे अशा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करणारे काम करा असे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.त्या अनुषंगाने कौपरखैरणे विभाग कार्यालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कार्यालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता आणि सुधारणा तसेच कार्यालयातील अभिलेखाचे नियमानुसार वर्गीकरण आणि नस्ती, कागदपत्रांची शासकीय सहा गठ्ठे पध्दतीने रचना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावर परिमंडळ उपआयुक्तांनी आठवडाभरात कार्यवाहीची प्रत्यक्ष तपासणी करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पुरविणे हे आपले कर्तव्य असून त्यादृष्टीने आपले नागरिकांशी सुसंवादी वर्तन असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत यामधूनच आपल्या कार्यालयाची प्रतिमा निर्माण होत असल्याने प्रत्येकाने ही आपल्याला लाभलेली लोकसेवेची संधी असल्याचे लक्षात घेऊन काम करावे असेही आयुक्तांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधताना सांगितले. या विभाग कार्यालयाच्या पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सर्वच विभागांमध्ये करण्यात यावी असेही निर्देशित करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारूळे, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त सुनिल काठोळे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे व संजय खताळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ०००००

ठाण्यातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षम करणार – आमदार संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : लाखो सर्वसामान्य नागरिकांशी नाळ कायम ठेवणाऱ्या ठाणे शहरातील काही पोस्ट कार्यालयांची दुरावस्था असून काही कार्यालये हद्दीबाहेर असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. तर काही कार्यालयांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. याबाबत त्रस्त नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक सूचना केल्या. तसेच शासन प्रशासनाच्या मदतीबरोबरच आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे शहरातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी, नवीन पोस्ट कार्यालये निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतरीत झालेली कार्यालये पुन्हा मूळ जागी आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी संबंधित नागरिक आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली. सॅण्डोज बाग पोस्ट कार्यालयाचे नामकरण कोलशेत पोस्ट कार्यालय करण्याबाबत श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पूर्वीचे सॅण्डोज हे नावच आता अस्तित्वात नसल्याने पोस्टाची जागा कोलशेत भागात असल्याने त्याचे नामकरण करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. पूर्वीच्या जे.के. ग्राम पोस्ट कार्यालयासाठी जी जागा उपलब्ध केली आहे ती तळघरात असल्याने ती बदलून पालिकेकडे नवीन जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. नौपाडा भागातील पोस्ट कार्यालय हे दम्माणी इस्टेट येथे गेली ५० वर्षे होते. इमारतीच्या पुनर्विकासानंतर विकासकाने त्याच जागेत कार्यालयासाठी जागा देण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. वागळे इस्टेट येथे सध्या पोस्ट ऑफिसच नसून पूर्वीचे १९८४ पासून असलेल्या पोस्ट ऑफिस ठाणे स्टेशनजवळील कार्यालयातून कार्यरत असल्याने नागरिकांना गैरसोईचे होते. त्यामुळे हे कार्यालय वागळे इस्टेट येथे पुन्हा स्थलांतरीत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती.केळकर यांनी दिली. पोस्ट कार्यालयाची उपयुक्तता गरीब, मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात असते.संपूर्ण शहरात आज याबाबत दुरावस्था असून नागरिकांनी त्रस्त होऊन निवेदने दिली होती. पुढील काळात सर्व पोस्ट कार्यालये सक्षम होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

२३ वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५

पुरूष विभागात अहमदनगर, पुणे ग्रामीण  तर महिला विभागात पुणे ग्रामीण बाद फेरीत बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे,  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत पुरूष विभागात अहमदनगर, महिला विभागात रत्नागिरी, पुणे ग्रामीण संघाने   धडक मारली आहे. वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या  तिसऱ्या दिवसाच्या  सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात   पुरूष विभागात ब गटात झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने वाशीम संघावर ३८-२१ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे २९-९ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या राहुल धनावडे व आशिष यादव यांनी आक्रमक खेळ करीत विजय सोपा केला. सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. वाशिम संघाच्या शेख अब्दुल शेख गुलाब याने काहीसा प्रतिकार केला. तर रघुनाथ पाटोळ याने पकडी घेतल्या. पुणे ग्रामीण संघाने अमरावती संघावर ४६-२६ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३२-१२ अशी २० गुणांची आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या अजित चौहान व शुभम शेळके यांनी चौफेर हल्ला चढवित अमरावतीच्या संघाला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. अनुज गावडे व  ओमकार लालगे यांनी चांगल्या पकडी घेत विजय सोपा केला. अमरावतीच्या अभिषेक पवार व ऋषिकेश तीवाडे यांनी कडवट प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तर सोमेश अजबले व राजा बेढेकर यांनी काही चांगल्या पकडी केल्या. महिलांमध्ये ब गटात रत्नागिरी संघाने अमरावती संघावर ५३-६ असा दणदणीत विजय मिळविला. मद्यंतराला रत्नागिरी संघाकडे ३६-५ अशी निर्मायक आघाडी होती. रत्नागिरीच्या समरिन बुरोंडकर सिध्दी चाळके यांनी चांगला खेळ केला. अमरावतीच्या संघाला मात्र या सामनन्यात कोणतीही चमक दाखविता आली नाही. मध्यंतरा नंतर अमरावती संघाने केवळ एकच गुणाची कमाई केली. अ गटात पुणे ग्रामीण संघाने नागपूर संघावर ५०-२२ अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे ३०-१० अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या किशोरी गोडसे हिने चौफेर चढाया करीत चांगला खेळ केला. तर वैभवी जाधव, मनशी बनसुडे, सलोनी गजमल यांनी चांगल्या पकडी घेतल्या. नागपूर शहरच्या ईश्वरी मूळणकर हिने चांगल्या चढाया केल्या. तर पूनम शाह हिने पकडी केल्या. 0000