Month: January 2025

महाडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासकीय जमीन देण्याचा नवा जीआर काढा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना राजेंद्र साळसकर मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी शासकीय जमीन ठरली होती त्याचा नवीन शासन निर्णय काढावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाने प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गांवर महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना महत्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी या रुग्णालयांत यावे लागते. परंतु येथे सोयी-सुविधांची वाणवा असल्याने येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न्यावे लागते. याची दखल घेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडला २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली होती. तसेच तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहारही केला होता. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास शासनाने मंजुरी दिली व २८ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला. तसेच १४७ कोटींच्या या कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. केंबुर्ली येथील स. नं. ५२/२ व ५३/२ अ मधील १५ एकर जमिनीचा ताबा देण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र या जमिनीऐवजी स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयासाठी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना पाठवला होता. असे असताना स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय का काढला? असा सवाल करत महसूल मंत्र्यांकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार आज याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली व महसूल मंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शासकीय जमीन देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा, असा सूचना संबंधित विभागाला दिल्या. या बैठकीला प्रविण दरेकर, महाड १९४ भाजपा विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त जगन्नाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार

कल्याण : अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर एकाच दिवशी 80 हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबूक मध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. जगन्नाथ शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. रेमडेसिवीर यांसारखी त्यावेळी दुर्मीळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांच्या जीवन मरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करूनही त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे. एका दिवसात ८० हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते. त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत रहा आणि दुवा घेत रहा असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड आदींसह इतर अनेक मान्यवर  उपस्थित होते.

अखेर डोंबिवली पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण कल्याण :  भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या.  त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे. चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या संप पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.  वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे राजू नगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळण्यात येते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान पाळून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती पनवेल : पनवेल मधील कलाक्षेत्रातील सरगम संगीत अकॅडमीच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला शेकापचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी भेट दिली. शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर कार्यक्रम “राग एक-रंग अनेक” याची गाण्यांची खूप सुंदर मैफिल होती. अल्पावधीतच नरेश पाटील यांनी १०० पेक्षा जास्त कलाकारांमधील गायनाचे गुण ओळखून त्यांना एक सुमधुर गायक बनवून आपले चांगले शिष्य निर्माण केले आहे. यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या सोबत संजीवनी जाधव (सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेत्री), गणेश पाटील (माजी उपनगराध्यक्ष पनवेल), प्रीती जॉर्ज (माजी नगरसेविका पनवेल), माधुरी गोसावी,  करुणा ढोरे यांच्या सह समस्त विद्यार्थीवृंद उपस्थित होते.

केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! पनवेल : भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस 600 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी भाजप नेते वाय.टी.देशमुख,टीआयपीलचे संचालक अमोघ ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर म्हणाले की,केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे.अतिशय मेहनतीने,जिद्दीने ते पक्ष कार्य करत असतात.त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रम शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला.त्यामुळे केदार भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले.यावेळी विशाल सावंत,सुमित दसवते, फिरोझ शेख, राजेंद्र भगत,नितेश भगत,रवी पारचे, संतोष वर्तले,चिन्मय भगत, चेतन म्हसकर,यज्ञेश पाटील,ब्रिजेश बहिरा, जयदीप भगत, संकेत दसवते, अभिषेक भालेकर, निहाल पाटील, शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते.

मोडीची गोडी प्रचारक बनून इतरांनाही लावा- प्रशांत सातपुते

अशोक गायकवाड रत्नागिरी : सराव माणसाला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करुन तिची गोडी प्रचारक बनून इतरानांही लावा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरालेखागार संशोधन सहायक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहायक लक्ष्मण भिसे उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर ती कायमस्वरुपी दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून तिचा सराव करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मोडीलिपीचे घेतलेले ज्ञान हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता तिचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारक म्हणून काम करा, असे सांगून मोडीचा इतिहास, भाषानिर्मिती आणि बोरु या विषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. साखळकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तीमत्व विकास त्याबरोबरच करिअर देखील उंचावता येते. संशोधन सहायक वाडकर यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. पंकज घाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनीही आपला अनुभव कथन केला. प्रा. मधुरा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी ओंकार आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

पगार नसल्याने गिरणी कामगारांची निदर्शने

रमेश औताडे मुंबई : मुंबईतील एनटीसीच्या चार बंद‌ गिरण्यातील कामगा रांच्या थकीत पगारावर राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी‌ निदर्शने केली. संघटनेचे‌ अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार  हे निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले. गेल्याच महिन्यात २४ डिसेंबर रोजी गिरणी कामगा रांनी तीन‌ महिन्या पेक्षा अधिक काळाच्या थकीत पगारासाठी एनटीसी व्यवस्थापनाला घेराव घालून,आपला संतप्त राग व्यक्त केला होता.त्यावेळी एनटिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांकुमगुणा यांनी दिल्ली होर्डींग्ज कंपनीशी बोलणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते. पण या प्रश्नावर संघटनेने‌ सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाने अकारण कालापव्यय लावला.त्यामुळे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने उपासमारीने त्रस्त कामगारांच्या प्रश्नावर हे निदर्शनाचे पाऊल उचलले. खजिनदार‌ निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रधान कार्यालयावर तिव्र निदर्शने केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील देशभरातील चालू असलेल्या २३ गिरण्या सन २०२० मध्ये कोविडचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या, त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत.रामिम संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिट णीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समन्वयक कृती समिती स्थापन करुन दिल्ली संसदेवर आंदोलन छेडण्यात आले. या प्रश्नावर खासदारांच्या  शिष्टमंडळाकडून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेटही घेण्यात आली होती.परंतु या प्रश्नावर केंद्र सरकारने पहिल्या पासूनच नरो वा कुंजोरोची भूमिका घेतली.या गिरण्यात मुंबईतील टाटा,इंदू मिल क्र.५,पोद्दार, दिग्विजय तसेच बार्शी,अंमळनेर या महाराष्ट्राच्या सहा एनटीसी गिरण्यांचा समावेश आहे.मुंबईतील गिरण्या म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी या द्रुष्टीकोनातून पाहिले गेले आहे. मुंबईसह राज्यातील सहा एनटीसी गिरण्यांच्या गंभीर परिस्थितीकडे  लक्ष वेधण्यासाठी मुंबईत किमान तीन‌‌ वेळा गिरगावात अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली.एनटीसी गिरण्यांची स्तावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. देशातील  इस्पितले,सरकारी‌ कार्यालये आदी ठिकाणी लागणारे कापड खरेदी एनटीसी गिरण्यां मधून सक्तीने‌ झाली तर‌ या गिरण्या सुस्थितीत चालू शकतील,शिवाय या गिरण्यांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, ही संकल्पना आमदार सचिनभाऊ अहिर यांनी मांडली होती.या गिरण्या सरकारला चालवाव्या लागतील अन्यथा कामगारांना मागील पगार द्यावा लागेल.गेल्या पाच वर्षांत सेवावृत्त झालेल्या कामगारांना त्यांची न्याय देणी द्यावी लागतील.

ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत

यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबविली असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्यातील बिल्डरांनीही घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाच्या काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांनी घराची २० टक्के रक्कम भरली तर, त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३० लाखांपासून ते कोटी रुपयांच्या किंमतीची घरे असणार आहेत. ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यात होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा आणि जय वोरा उपस्थित होते. ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन  ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाईल, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून प्रदर्शनस्थळापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रदर्शनात एका इमारतीबरोबरच प्रशस्त गृहसंकूले आणि परवडणाऱ्या घरांपासून उत्तम जीवनशैलीतील आलिशान घरे, व्हिला, कार्यालयीन जागा, दुकाने असे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल. अनेक गृहसंकूलांमध्ये छोटे वन बीएचकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याला अपेक्षित किंमतीनुसार घरांची निवड करता येतील. तसेच गृहसंकुलातील सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन तुलना करता येईल. तसेच सुरक्षित व सोयीस्कर घराची निवड करता येईल. यामध्ये ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. यामुळे प्रदर्शनात ३० लाखांपासून पुढे कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. कशेळी-काल्हेर भागातील काही घरेही प्रदर्शात विक्रिसाठी असतील, असेही मेहता म्हणाले. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील, असेही ते म्हणाले. प्रदर्शनाची वैशिष्टये सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले, ठाणे पूर्व रेल्वे स्टेशबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वैलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृह प्रकल्प स्टाॅल, १५ हून अधिक वित्त संस्था, २५ हजारांहून अधिक घरखरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दिड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.