Month: January 2025

 ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम

 कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर   ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे. या सर्वाची यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजिट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच, महापालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे. कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे बैठक घेतली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांच्यासह पालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले. या आढावा बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त राव यांनी राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पद्धतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 0000

आतकोली क्षेपणभूमी येथून दगड आणि पाणी यांची चोरी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथे क्षेपणभूमीसाठी भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे प्रवेश करून सुमारे ५४१० ब्रास दगड आणि दररोज सुमारे…

आता ७२ तासांच्या आत खड्डा बुजणार

हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक विभागात वर्षभरात जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील 98 टक्के खड्डे बुजविण्याचा दावा नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती त्वरीत मिळावी यासाठी बांधकाम विभागाने पीसीआरएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर माहितीनुसार 72 तासांच्या आत खड्डा बुजविण्यात येतो. मात्र नाशिक – त्र्यंबक रोड, नाशिक – दिंडोरी या खड्डेमय मार्गांकडे विभागाचे लक्ष वेधले असता निधीअभावी खड्डे बुजविण्याचे काम थांबले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित नाशिक विभागातील 23 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील २२00 किलोमीटर, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५२00 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करण्यात येते. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांना खड्डे पडतात, यामुळे वाहने चालवताना वाहनचालक बेजार होतात. गतवर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मोठी मोहीम राबविली. मोहिमेवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष ठेवले. मोहिमेनंतर 98 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. पीसीआरएस अ‍ॅपवर द्या खड्ड्यांची माहिती जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पीसीआरएस हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर तक्रार दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत खड्डे बुजविण्यात आल्याचे उत्तर अ‍ॅपद्वारे देण्यात आले. अ‍ॅपचा वापर सहजपणे करता येत असल्याने नागरिकांकडून तक्रारी दाखल करण्यात वाढ झाली आहे. कोट पीसीआरएस अ‍ॅपमुळे खड्ड्यांची माहिती त्वरीत उपलब्ध होते, यामुळे खड्डे बुजविणे सोपे झाले आहे. नागरिकांचा प्रवास सहज आणि सुलभ व्हावा यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. काही कारणास्तव जिल्ह्यातील मार्गांवर खड्डे असल्यास ते त्वरेने बुजविले जातील. प्रशांत औटी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक. ००००

मकर संक्रांतीला पतंग उडवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांती सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि /…

माथेरान नगर परिषदेकडून मच्छरदाणीचे वाटप

माथेरान : माथेरानचा संपूर्ण भाग हा जंगलाने व्यापलेला असून यामध्ये काही प्रमाणात विषारी सापांचे प्रमाण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे साप कधी कधी चुकून घरामध्ये शिरतात. आणि या विषारी सापांपासून कुणालाही…

 मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

 महात्मा गांधी विद्यामंदिरमध्ये `मराठी गौरव सन्मानपत्र’ सोहळा संपन्न   कल्याण : मुलांचे शालेय शिक्षण मातृभाषेतून  झाले पाहिजे व ते शिक्षण सर्वोत्तम असतें हे विविध शैक्षणिक तज्ञांनी अधोरेखित केलेले आहे. मात्र भारतीयांवर असलेला इंग्रजीचा प्रभाव यामुळे पालक मातृभाषा मराठीमध्ये प्रवेश न घेता मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मराठी शाळांच्या पटसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलांना मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम डोंबिवली येथील रेल चाइल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या  शाळेने आयोजित केला होता. मातृभाषा मराठीतून शालेय शिक्षण घेणे चांगले असतें हे पटल्याने पाल्यांचे प्रवेश घेतल्याने शाळेची पटसंख्या वाढली व  अभिजात , समृद्ध , संपन्न अशा मराठी या ज्ञानभाषेतून शिकण्याची सुवर्णसंधी पाल्यास दिली म्हणून `मराठी गौरव सन्मानपत्र’ देऊन पालकांचा नुकताच गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुणे येथील मराठी काका  अनिल गोरे, गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष अलका मुतालिक,  सेवानिवृत्त एसीपी बाळकृष्ण वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रदीप गवळी, रे.चा.संस्था कार्यवाह झरकर, कोषाध्यक्ष पटवर्धन, निमंत्रित सदस्य मंगेश देशपांडे, १४३ विधानसभा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे,  सीआरसी प्रमुख महेश्वरी आदी मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे अनिल गोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी माध्यमातून शालेय शिक्षणाचे उपयुक्तता तसेच शैक्षणिक फायदे अत्यंत रंजक माहितीद्वारे सांगितले. त्यांनी आवाहन केले कि पालक वर्गाने सर्व परिचितांना, नातेवाईकांना, मित्रांना  मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास  प्रेरित करावे.  इंग्रजी शाळेत मुलांना घालून पालक चूक करत आहेत कारण मराठी माध्यमातील शिक्षण हे कस्तुरीमृगासारखे आहे. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मराठी शाळेची मुले जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही हा त्यांचा अनुभव आहे. मराठी शाळेतच मुलांच्या व्यक्तीमत्वाचा खरा विकास होतो व तेथेच मुलांचं भविष्य उज्वल आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर सारखी एखादी शाळा ` पालकांचा असा सत्कार करते व असा स्तुत्य उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रल्हाद म्हात्रे यांचा माजी विद्यार्थी म्हणून ` मराठी गौरव सन्मानपत्र ‘ देऊन गौरव करण्यात आला. तसेच  उपस्थित पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रल्हाद म्हात्रे यांनी ५१००० रू. चा धनादेश शाळेला मदत म्हणून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले व सूत्र संचालन ललिता कुलकर्णी यांनी केले.

शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त 64 भाज्यांची आरास

कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनाका, कल्याण पश्चिम (दिंडोरी प्रणित) येथे शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त 64 भाज्यांची आरास साकारण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त कल्याण पारनाका स्वामी समर्थ सेवा केंद्रात…

क्रीडा शिक्षक डॉ. भूषण जाधव सोलापूर महानगरपालिकाचे क्रीडा अधिकारी

कल्याण : कल्याणचे क्रीडा शिक्षक डॉक्टर भूषण जाधव हे सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी पदी नुकतेच रुजू झाले. तलवारबाजी या खेळाचे एनआयएस कोच असणारे डॉक्टर भूषण जाधव हे कल्याणच्या सेक्रेड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. तलवारबाजी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मजल मारली. तलवारबाजीच्या या कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन ही नुकतेच गौरवण्यात आले होते. या सर्व कार्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेने त्यांची सरळ क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. मूळचे छत्रपती संभाजीनगर चे असणारे डॉक्टर भूषण जाधव यांनी लहानपणापासूनच डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी या खेळांमध्ये आपले करिअर करण्याचे आव्हान स्वीकारले. कुटुंबातूनही त्यांना या खेळासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळाले.  त्यामुळेच त्यांनी तलवारबाजी या खेळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य स्पर्धां बरोबरच तलवारबाजी प्रशिक्षणासाठी विदेश दौरे ही केले. या खेळाचे एनआयएसचे पहिले प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी राज्यात मान पटकावला. तलवारबाजी या खेळामध्ये त्यांना डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे, सेक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अल्बिन अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले. तर या निवडीबद्दल त्यांचे डॉ उदय नाईक, प्रा. लक्ष्मण इंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, अविनाश ओंबासे, प्रताप पगार, राम म्हात्रे, विश्वास गायकर, विजय सिंग, महादेव क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 000000

अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ठाण्यात ढोल-ताशे व बॅण्ड वाजवा

 भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची मागणी   ठाणे : महापालिकेचा दहा लाखांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल-ताशे व बॅण्ड वाजवावेत, अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे. मालमत्ता थकबाकीदार बिगरनिवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजात ढोल-ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना, ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, सद्यस्थितीत दुर्देवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे  वाघुले यांनी लक्ष वेधले. अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून, महापालिकेच्या अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व मलवाहिन्या जोडल्या जात आहेत. या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूककोंडीत भर पडत आहे. ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसविण्याची आवश्यकता आहे, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिकेच्या बारा प्रभाग समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्तपदाबरोबरच परिमंडळ २ चा कार्यभार  शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी  वाघुले यांनी केली आहे. 00000

 कचरा संकलनात हलगर्जीपणा

केडीएमसीकडून या 3 प्रभागातील कंत्राटदाराचा ठेका रद्द   कल्याण : कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रात सात प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नविन खासगी एजन्सीचे कामही लवकरच सुरू होणार असून त्यानंतर हा सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बी, डी आणि जे या तीन प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत कचरा संकलनासाठी आर अँड बी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून जुन्या झालेल्या कचऱ्याचा गाड्या, सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या आणि नादुरुस्त असलेल्या गाड्यांमुळे या तिन्ही प्रभागांतील कचरा संकलनावर मोठा परिणाम झाला होता. या प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याबद्दल अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावर केडीएमसी प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला रीतसर नोटीसही बजावली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीच सुधारणा न झाल्याने अखेर या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. तसेच त्यांच्याऐवजी आता केडीएमसीच्या सफाई कर्मचारी आणि यंत्रणेकडूनच बी डी आणि जे प्रभागांमध्ये कचरा संकलन केले जाणार आहे. मात्र हे काम सकाळऐवजी दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेमध्ये केले जाणार असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रातील ए बी आणि सी हे तीन प्रभाग वगळता उर्वरित 7 प्रभगांतील कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया पद्धतीसाठी नविन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये या एजन्सीचे काम सुरू होणार असून त्यानंतर या सातही प्रभागातील सफाई कर्मचारी आणि इतर यंत्रणा केडीएमसी प्रशासनाकडून ए बी सी प्रभागांमध्ये वळवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर या तिन्ही प्रभागांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने साफ सफाई आणि स्वच्छतेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याची महत्त्वाची माहितीही उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्व नविन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ब, ड आणि जे प्रभागातील नागरिकांनी काही काळ कळ सोसून महापालिका प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे. तसेच कचरा संकलन करणारी गाडीला उशिरा झाल्यास रस्त्यावर, मोकळ्या जागेमध्ये किंवा उघड्यावर कचरा न टाकण्याचे करण्याचे आवाहनही उपायुक्त  अतुल पाटील यांनी केले आहे. 0000