Month: January 2025

मुंबई पोर्टमधुन सेवाभावी कार्यकर्ते गणेश पोळ सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणामधील २७  वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा  सेवानिवृत्ती बद्दल २८  जानेवारी २०२५  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. गणेश पोळ हे मुंबई पोर्टमध्ये ५  जानेवारी १९९८  रोनजी टॅली क्लार्क  म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना नोकरीमध्ये  टीसीसीसी, ज्युनियर असिस्टंट,  सीनियर असिस्टंट असा बढतीचा प्रवास मिळाला. गणेश पोळ यांचा २७  वर्षाच्या कालावधीमध्ये  मुंबई पोर्टच्या जमीन धोरणात सहकार्य करण्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता.  म्हणूनच तत्कालीन चेअरमन श्रीमती राणी जाधव यांनी मुंबई पोर्ट लँड पॉलिसीचा जो केंद्र सरकारला अहवाल पाठविला,  त्यामध्ये त्यांचा नामोउल्लेख होता. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये नोकरी लागण्यापूर्वी त्यांनी गुड नाईट या कंपनीच्या  उत्पादकतेमध्ये संशोधनाचे मोठे काम केले आहे. त्यांच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा मुंबई पोर्ट  प्रशासनाला चांगलाच फायदा झाला.  त्यांनी मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व निस्वार्थीपणे सेवा केली.  त्यांच्या सेवेचा अनेक कामगारांना व  अधिकार्‍यांना चांगलाच फायदा झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासात गोल्ड मेडल मिळविले आहे. मुंबई पोर्ट  मधुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन गणेश पोळ यांनी सिव्हीलमध्ये वकिलाची प्रॅक्टिस करण्याचा  निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा व हुशारीचा  न्यायालयामार्फत  सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळो, अशा सर्वच वक्त्यांनी  त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पोळ यांच्या सेवाभावी कार्यावर आधारित ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे  व फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्टचे मुख्य यांत्रिक अभियंता नितीन बोरवणकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर्स प्रदीप नलावडे,  ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे  पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील. संदीप चेरफळे तसेच कर्मचाऱ्यांमधील सहकारी मित्र मंगेश गवारे, संदीप गावडे. ॲड. गिरीश तळेकर. अधिकारी बोस, पत्नी रेखा पोळ मुलगी अनुषा पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. गणेश पोळ यांनी सत्काराला उत्तर दिले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी शीला भगत,  विष्णू पोळ, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस,  संतोष कदम तसेच मुंबई पोर्टचे अधिकारी, गणेश पोळचे सहकारी मित्र,  कुटुंबिय, गोदीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मंगेश सावंत यांनी  सुंदर केले तर आभार युनियनचे संघटक चिटणीस आप्पा भोसले यांनी मानले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सत्कार

अनिल ठाणेकर ठाणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण ५३ गटामध्ये स्पर्धा राबविण्यात आली होती‌. जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून ६ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला असून ४ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला असून ३ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन या कामात विशेष स्व.वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हाळुंगे ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. शौचालय व्यवस्थापन या कामासाठी स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील आर.आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन १० ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.‌ आर.आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव सन २०२१-२२ वर्षातील कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीस जिल्हा सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील कुसापूर ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, मुरबाड तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील साई ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव सन २०२२-२३ वर्षातील मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील डोहाळे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील वाशिंद ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, कल्याण तालुक्यातील पळसोली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर

पुणे: मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाची कार्यक्रम रूपरेषा अखेर जाहीर झाली आहे. मंगळवारी अधिकृत कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाविषयी प्राथमिक माहिती दिली होती. मात्र, त्यामध्ये नेमक्या कार्यक्रमांचा उल्लेख नव्हता. अखेर मंगळवारी विश्व मराठी संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पृष्ठावर संमेलनाचा संपूर्ण कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य ठळक मुद्दे: ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर येथून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. ११ वाजता उद्घाटन समारंभ, ज्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचा ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम. दुपारी १.१५ वाजता ‘माझी मराठी भाषा अभिजात झाली’ या विषयावर परिसंवाद व पुस्तक प्रकाशन. या चर्चासत्रात डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख आणि रवींद्र शोभणे सहभागी होणार आहेत. ‘मराठी भाषा आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर दुपारी ३.३० वाजता संपादकांचा परिसंवाद. त्यानंतर नव्या-जुन्यांचे कवी संमेलन रंगणार आहे. सायंकाळी ५.४५ वाजता, आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमांचे सादरीकरण आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचावर होतील. इतर महत्त्वाचे उपक्रम: प्र. के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर) येथे दुपारी २ वाजता मराठी बोलीभाषांचे सर्वेक्षण या विषयावर डॉ. सोनल कुलकर्णी यांचे सादरीकरण. ३.१५ वाजता अनुवाद विषयक चर्चासत्र, ज्यामध्ये रवींद्र गुर्जर, डॉ. उमा कुलकर्णी आणि लीना सोहनी सहभागी होतील. ही संपूर्ण कार्यक्रम रूपरेषा जाहीर झाल्यामुळे संमेलनाविषयी असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. विश्व मराठी संमेलन मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचा सोहळा ठरणार आहे.

देशाचे संविधान बदलणार ही ‌भिती व्यर्थ , तसे झाले‌‌ तर देश रस्त्यावर उतरेल!-अॅड.वालावलकर

राजेंद्र साळसकर मुंबई : देशाचे संविधान बदलणार ही भिती व्यर्थ आहे.संविधान बदलने इतके सोपे नाही आणि जर‌ तसे झाले तर त्याविरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे वकिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अमृतमहोत्सवी वर्षांची वाटचाल,यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या परळ येथील आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने रविवारी प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या‌ औचित्याने २५ वकीलांचा,परळगाव, लालओठा मैदानावरील सुसज्ज शामियान्यात गुणगौरव सोहळा पार पडला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.नरेंद्र‌ वालावलकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या वकीलांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन‌ गुणगौरव‌ करण्यात आला.सत्कारात महिला वकिलांचाही समावेश होता‌. त्यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर आपल्या भाषणात पुढेम्हणाले,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य आणि अधिकार या गोष्टी बहाल करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संकुचित होता कामा नये,त्याचे संरक्षण करण्याची शिकवण देणारा प्रजासत्ताकदिन आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कोल्हापूरे होते. मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस विजय परदेशी म्हणाले,हे डॉक्टर,वकील‌ यांचा ते‌ पेशा बजावत असले‌ तरी,ते विविध समाजाची‌ बांधिलकी निभावत असतात.त्याची सामाजिक संस्थांनी उचित अशी दखल‌ घेणे‌,ही त्यांची नैतिक जबाबदारी असते.तीच जबाबदारी जोपासण्याचे‌ काम आम्ही करीत आहोत.याप्रसंगी स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली. या प्रसंगी परळगावातील‌‌ लेखक काशिनाथ माटल यांच्या लेखणीची ओळख करून देताना विजय परदेशी म्हणाले, काशिनाथ माटल यांनी पाच वाचनीय आणि उत्कृष्ट कथासंग्रह ‌लिहून परळकरांना अभिमान संपादून दिला आहे. त्यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचा दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे,त्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात‌ आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते‌.

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेना उबाठा शिव आरोग्य सेनेच्यावतीने डायलेसीस रुग्णांना औषधे व श्रवणयंत्र वाटप

ठाणे –  धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत…

विहंग संस्कृती कला महोत्सवाला रसिकांचा जोरदार प्रतिसाद

सिमेंट-काँक्रिटचे जंगल असलेल्या मिरा – भाईंदरमध्ये सांस्कृतिक कलामहोत्सवाची पर्वणी अरविंद जोशी मिरा-भाईंदर : या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षक पहाटेच्या दवात तसेच अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर च्या सुरात नाहून निघाले.  या वेळी गायक मंदार आपटे यांनी अभंग आणि गाणी म्हटली. काल पहाटेच्या कार्यक्रमात पंडित  रितेश  आणि रजनीश मिश्रा यांनासुद्धा रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी संध्याकाळी कार्यक्रमाची सुरुवात पाशर्वगायक अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यानी झाली. शनिवारी संध्याकाळी पार्शवगायिका साधना सरगम यांचा रंगतदार गाण्यांचा कार्यक्रम पर पडला. रविवारी संध्याकाळी गुलाबी साडी फेम संजू राठोड यांचा मंत्र मुग्ध करणारा कार्यक्रम पार पडला. तसेच येथे स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी मुद्रा रंगमंच देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी महोत्सवात अनेक शालेय विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. प्रदर्शने, क्रीडा, कलादालन, पाळीव प्राण्यांची धाव, रांगोळी प्रदर्शन, मुलांसाठी साहसी खेळ, फूड कोर्ट आणि स्थानिक कलाकारांचे कला प्रदर्शनही येथे आयोजित केले आहे. या महोत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वर्णन करणारी छायाचित्र दालन आणि राजा रवि वर्मा यांच्या अमूल्य चित्रांचे प्रदर्शन लोकांना उपलब्ध करून दिले आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात एक लाखाहून अधिक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोमवारी संध्याकाळी मिका सिंग यांच्या संगीत रजनीने या प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित महोत्सवाची सांगता होणार आहे. मीरा भाईंदर शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्यासाठी हे फेस्टिवल मोठे काम करीत आहे. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या, विविध कलांचा अविष्कार असणाऱ्या या फेस्टिवलला मिरा भाईंदरकर नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत , दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली येथील जी-41,सेक्टर- 03, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम आज दिनांक 27/01/2025 रोजी अतिक्रमण मोहिम राबवुन सदर बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी जी विभाग ऐरोलीचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच अतिक्रमण पोलिस पथक उपस्थित होते.  सदर कारवाईसाठी 3 हॅमर, 1 गॅस कटर, 3 ब्रेकर, 15 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, उरण फाटा नवी मुंबई महामार्ग (हायवे) रस्त्यालगत असलेल्या एकूण 22 अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. अे विभाग कार्यालय बेलापूर व बी विभाग कार्यालय नेरुळ कार्यालयामार्फत संयुक्त मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आलेले आहेत. या धडकमोहिमेसाठी अे विभाग कार्यालय व बी विभाग कार्यालयतील अधिकारी/ कर्मचारी, मजूर- 12, जेसिबी-01,तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.