Month: January 2025

गौरीपाडा परिसरात पथदिव्यांचा झगमगाट

स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश कल्याण :  गौरीपाडा परिसरातील नागरीकांच्या तक्रारीनुसार साई सृष्टी सोसायटी व  प्रकृति आंगन सोसायटीतील प्रवेशद्वार समोर पथदिवे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करताना नागरीक,महिला , जेष्ठ नागरिक यांना समस्यांचा सामना करावा लागत होता, पथदिव्यांसाठी मागील काही वर्षांपासून स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून  कल्याण डोंबिवली महानगरपालिका विद्युत विभागाकडे  पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होते होता.  निधी अभावी मंजूरी मिळत नव्हती यासाठी स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा‌ करण्यात आला. त्याला नुकतेच यश आले असून गौरीपाडा परिसरातील साई सृष्टी सोसायटी व प्रकृति आंगन सोसायटीतील पथदिव्यांसाठी पथदिवे (स्ट्रिट लाईट)बसवुन २६ जानेवारी  रोजी  सुरू करण्यात आले. यानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच विद्युत विभाग व कर्मचारी यांचे आभार स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी मानले तर या परिसरातील नागरिकांनी  याबद्दल समाधान व्यक्त केले.

रक्तदान शिबिरात 263 जणांचे रक्तदान

कल्याण डीसीपी, कल्याण प्रांत आणि फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे आयोजित कल्याण  : फ्रेंड्स फाऊंडेशन, कल्याण उपविभागीय अधिकारी आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथील युनियन ग्राऊंडवर सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या या रक्तदान शिबिराचे यंदाचे हे 10 वे वर्ष होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजन केल्या जाणाऱ्या या सामाजिक उपक्रमामध्ये तब्बल 263 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ज्यामध्ये सामान्य रक्तदात्यांसह कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, प्रांताधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांनीही रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी फ्रेंड्स फाऊंडेशन, कल्याण उपविभागीय अधिकारी आणि डीसीपी यांच्या संयुक्त विद्यमाने या सामजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. ज्याला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती आयोजक राहुल दाभाडे यांनी दिली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, रुपेश म्हात्रे, नायब तहसीलदार रिताली परदेशी, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, सुनिल वायले, शालिनी वायले, सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे, युवा नेते वैभव भोईर, रितेश वायले, रुपेश सपकाळ, सागर उठवल यांच्यासह कल्याण प्रांत कार्यालय आणि डीसीपी कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

संतांच्या महाराष्ट्रात, संत संस्कारांचे अधिष्ठान बळकट होण्याची गरज..!

काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केलं मत पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच बीड, परभणी, बदलापूर, ठाणे येथे घडलेल्या घटना या मानवतेस लाज आणणाऱ्या व देशात राज्याची बदनामी करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे संताची शिकवणुक सत्य, नैतिकता, मानवता व न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने.. सद्यः परीस्थितीत राज्यातील समाज जीवनात संत संस्कारांचे व नैतिकतेचे अधिष्ठान अधिक बळकट करणे काळाची गरज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले. अम्युनेशन फॅक्टरी व सलग्न संस्था खडकी यांच्यावतीने हभप  ‘किर्तन महोत्सवांचे’ आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप प्रसंगी गोपाळ दादा तिवारी यांनी विचार मांडले. कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, किर्तन महोत्सवाचे संयोजक व अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, रमेश भिडे पाटील, विकास नाना दांगट, जेष्ठ पत्रकार दिपक जाधव, भोलाशेठ वांजळे इ यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, वरील अमानवी घटनांमुळे महाराष्ट्र देशभर बदनाम होत असून शिव – छत्रपतींच्या महाराष्ट्रात संतांचे संस्कार लोप पावत चालले काय(?) असा प्रश्न विचारून ते म्हणाले की, “मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।” असे संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. राष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या संतांच्या भूमीत नीतिमत्तेला पायदळी तुडवून विकृती डोके वर काढत असेल तर वारकरी संप्रदायाने सज्जनांचा धाक वाढण्यासाठी, संतांची चळवळ तीव्र करणे व नैतिक अधिष्ठान प्रस्तापित करणे गरजेचे आहे असे काँग्रेस नेते, गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. हभप संतोष महाराज पायगुडे यांनी समारोपाच्या किर्तनात सांगितले की, ‘भारतभूषण म्हणावे असे आपले पुणे आहे. पुण्यात पहिला अभंग लिहिला गेला, ज्ञानेश्वरी पुण्यात लिहिली गेली इतकेच नव्हे तर देशातील पहिला दारूगोळा कारखाना पुण्यात उभा राहिला, अशी पुण्याची कीर्ती आहे. या प्रसंगी.. सामुदायिक अभंगां बरोबरच.. “जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’ ही देश भक्तीपर सामुहीक गीत देखील गायले गेले..! पैलवान माणिक ढोले, संतोष देशमुख, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी कीर्तन महोत्सवाला भेट दिली. अमिनेशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक संजय हजारी, दीपक महाजन, विजय कुटील, मनमोहन खंदारे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले..!

 एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही -राजन विचारे

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी अनिल ठाणेकर ठाणे : एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले.संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू असल्याचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे,संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे धर्मराज पक्षाचे राजन राजे, महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख ,उपशहर प्रमुख, व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्टेशन परिसरात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पवित्र संविधानाची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत संविधानावर प्रेम करणारे शेकडो जण उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक वेळा संविधानाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. गेल्या पाच वर्षात घटनाबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असून नियमबाह्य कारभार करून पक्ष चोरणे, पक्षाचे चिन्ह पळवणे तसेच न्यायालयाकडूनही आपल्या मर्जीप्रमाणे निकाल लावणे असे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. मात्र हेच चित्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. त्यामूळे ही सर्व कृती संविधानाच्या विरोधात केलेली असल्याचे समोर आले आहे.

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे : रविवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्याचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली “खंबीर साथ, त्यांचा त्याग” आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही.मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असे मत दैनिक बित्तंबातमी प्रतिनिधी अशोक गायकवाड यांच्या बरोबर बोलताना सानप यांनी व्यक्त केले.

 पालकांनी पाल्यांना मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्यावा

ठामपा शिक्षण विभागाचे आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळांतून नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. या जाहिराती पालकांचे लक्ष वेधून घेत असून या माध्यमातून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असून पालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत एकूण 81 शाळा अनधिकृत असून यात मराठी माध्यमाच्या 02, हिंदी माध्यमाच्या 02 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळा आहेत. या शाळांमधून आयसीएसई, सीबीएसई, आयबी तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या  रोजी प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी महापालिकेने दिनांक  30/7/2024 रोजी स्थानिक वृत्तपत्रात शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नव्याने सर्वेक्षण करुन अनधिकृत शाळांचा शोध घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांच्या सहकार्याने अधिकृत शाळेत समायोजन करणे, दिवा परिसरात महापालिका स्तरावरुन मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याबाबत  प्रयत्न सुरू आहेत, त्याचप्रमाणे अनधिकृत शाळांवर बालकांचा मोफत  व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सदरची शाळा अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी करावी. तसेच शाळेचा युडायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह आदी आहे किंवा नाही याची खात्री करुनच घ्यावी जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही असे आवाहन पालक नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पालकांनी मान्यताप्राप्त शाळेतच पाल्यांचे प्रवेश करावेत. तसेच शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास ठाणे महानगरपालिका स्तरावर ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग, विष्णुनगर, नौपाडा या ठिकाणी संपर्क साधवा. पालकांनी त्यांच्या पाल्याचा अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहणार नाही याची नोंद घ्यावी असे शिक्षणधिकारी कमलाकांत मेहेत्रे यांनी नमूद केले आहे.

रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले सा. बां. चे अधिकारी रिकाम्या हाताने परत

अतिक्रमण करणाऱ्यांनी घेतला मुस्लिम असल्याचा गैरफायदा; अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करणारा देखील मुस्लिमच राज भंडारी रायगड : नागोठणे – पोयनाड रस्ता क्र – 87 हा रस्ता HAM अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहदारीच्या दृष्टीने सहा पदरी असे रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्यावतीने भुसंपादित करण्यात आला असतानाही याठिकाणी येथील काही तरुणांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला. मात्र येथील अतिक्रमण हे आजही ऐटीत उभे राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप स्थानिक तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी केला आहे. तसेच अतिक्रमण धारकांकडून मुस्लिम असल्यामुळे नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा बनाव करण्याचा प्रकार हा पूर्ण खोटे असल्याचा निर्वाळा देखील देत मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम अतिक्रमण धारकांनी केले असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. येथील स्थानिक मुळ जागामालक नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. सदरील चौक रस्त्यालगत दोन शाळा आणि महाविद्यालये आहेत तसेच याच रस्त्यावर रिलायन्स कंपनी देखील आहे. या कंपनीमुळे याठिकाणी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये – जा करीत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकानी ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे आहे. मात्र सदर चौक परिसरात तब्बल 7 जणांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली आहेत. याचा फटका येथील शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे स्थानिक तक्रारदार नसीम खान यांनी याठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील यांनी सदरील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा 07 ऑगस्ट 2024 पासून अतिक्रमण धारकांना पाठविल्या. यामध्ये मंजर महम्मद अली जुईकर, इकबाल पेणकर, बशीर शिदी, म्हात्रे ट्रेडर्स, मीरा गॅरेज, आयझल चिकन सेंटर आणि पटेल हॉटेल यांच्या नावाने नोटीसा काढण्यात आल्यानंतर सदरील अतिक्रमण हे 7 दिवसात हटविण्याचे या अतिक्रमण धारकांनी मान्य केले होते. मात्र साडे पाच महिने उलटून गेल्यानंतरही सदर अतिक्रमण हे अतिक्रमण धारकांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हटविण्यात आले नाही. नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबतचा तगादा लावल्यामुळे पेण येथील सार्वजनिक बांधकाम बिभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी रोजी सदरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सदरील अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम म्हणजे दिखावेगिरी असल्याचा आरोप तक्रारदार नसीम अधिकारी यांनी केला. यामध्ये रस्त्यासाठी दोन्ही बाजूने 30 – 30 मिटर असे एकूण 60 मिटर भुसंपादित क्षेत्र असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अर्धवट अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तक्रारदार यांनी पूर्ण अतिक्रमण हटवून रस्त्याच्या रुंदीकरण कामाची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक रिकाम्या हाती माघारी झाल्याने या प्रकारात आर्थिक दबाव आहे का? असा संशय देखील नसीम खान अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सदरील प्रकाराबाबत अधिकारी कुटुंबाने 7 – 10 – 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना याठिकाणी सदरील अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर आणि मोहब्बत अजीम हे याठिकाणी दाखल झाले. यावेळी तक्रार यांच्यासोबत वाद घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या वतीने या दोघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुळातच गुन्हेगारी वृत्तीने अतिक्रमण केले असल्याचा हा सढळ पुरावा शासनाकडे असतानाही शासनाचे अधिकारी या अतिक्रमण धारकांना वारंवार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नसीम खान अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 21 ऑक्टोबर  रोजी पेणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटविणारे पथक या ठिकाणी आले असताना मात्र अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा कांगावा केला. तसेच अतिक्रमण पथक हे माघारी फिरल्यानंतर आपण विजयी झाल्यासारखे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं केले. मात्र हे अतिक्रमण धारक पूर्ण खोटे बोलून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत योग्य ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही बोलताना त्यांनी सांगितले.

 मुंबई पोर्टमधील गोदी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न

मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या गोदी विभागातील नोकरीत असणारे कर्मचारी व सेवानिवृत्ती  कर्मचाऱ्यांचे  ४८ वे कौटुंबिक स्नेहसंमेलन २६ जानेवारीला शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सर्वप्रथम ७६  व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या  मुंबई बंदरात पूर्वी ४४ हजर कामगार होते,  आता २७०० कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील मुंबई बंदरातील गोदी कामगारांनी ६५ दशलक्ष टन मालाची चढ उतार केली आहे. गोदी कामगारांनी कमी कामगारांमध्ये जास्त उत्पादकता काढली आहे. बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढीचा वेतन करार झाला आहे. या वेतनकराराची प्रत्यक्षात वाढ १  फेब्रुवारी २०२५  पासूनच्या पगार व  पेन्शनमध्ये मिळणार आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, मुंबई बंदर प्राधिकरण आऊट डोअर डॉक्स स्टाफ पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट  एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष अंकुश कांबळे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन फिलोंथरोपी फाउंडेशनचे पदाधिकारी  व उत्कृष्ट निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर  यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,  सेवानिवृत्तीबद्दल बापू घाडीगावकर व दुबे यांचा सत्कार करण्यात आला. गोदी विभागातील अधिकारी व युनियन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “नियम व अटी  लागू करा” या लोकप्रिय नाटकाचा २८२ वा प्रयोग दाखविण्यात आला. स्नेहसंम्मेलनासाठी आलेल्या  गोदी कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबामुळे सभागृह भरगच्च भरले होते.

सानपाडा येथे  एसपीएल २०२५ क्रिकेट सामन्यांचा सांगता सोहळा  संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील सानपाडा तरुणाईची व क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला, अशी माहिती मारुती…

कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :  कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने खालापूर विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रसायनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कर्जत प्रकाश संकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक रसायनी संजय बाबर, पोलीस निरीक्षक खोपोली शीतल राऊत, पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा, अग्निशमन दलाची गरज, अखंडित वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.