आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे

शासकीय आश्रमशाळेत रूपांतर करण्याची मागणी

राजीव चंदने

मुरबाड : तालुक्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील एका दहावी इयत्तेत शिकणार्‍या  विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीआहे. घटनेचा तपास टोकावडे पोलीस स्टेशन मध्ये सुरू असून आदिवासी विकास विभागाचे या  निवासी शाळेच्या अधीक्षक अणि मुख्याध्यापकांना शाळेच्या आवारातच राहण्याचे निर्देश असताना हा विद्यार्थी शाळेच्या बाहेर कसा गेला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहें,या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, निसर्गरम्य,सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या वाल्हिवरे गावात लोकसेवा शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सुभाष तुलजी रावते याने दुपारच्या सुमारास शाळेपासून लांब अंतर असणाऱ्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत चा तपास तालुक्यातील टोकावडे पोलिस करत आहेत. मात्र ही शाळा निवासी असतांना या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही या शाळेतील मुख्याध्यापक व अधिक्षक यांची असताना हा विद्यार्थी शाळेबाहेर गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर विद्यार्थी हा मु.खोरेपाडा, ता.जव्हार,जि.पालघर येथील होता.शाळेची पटसंख्या भरण्यासाठी तालुका आणि जिल्ह्याबाहेरील आदिवासी विद्यार्थी हे आणले जातात. मात्र शासकीय अनुदान लाटण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या आरोग्य, दैनंदिन गरजा, सुरक्षितता याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.

या सर्व निवासी मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी  शिक्षक व अधिक्षकांवर असते. परंतु शाळेतील विद्यार्थी दिवसभर शाळेबाहेर जाऊन आत्महत्या करतो तरी शाळेतील अधीक्षक अणि मुख्याध्यापक यांना याची कल्पना नव्हती.अधिक्षक व मुख्याध्यापक हे शाळेत उपस्थित नसल्याची माहिती शाळेतील काही विद्यार्थ्यांना विचारले असता मिळाली आहे.

शाळेतील मुले अणि मुली यांना सांभाळण्यासाठी पुरुष अणि स्त्री अधीक्षक असताना या शाळेमधे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या तर झाली नाही ना ? या विद्यार्थ्यांला शाळेतच मारहाण करून झाडाला लटकून ठेवले तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे निर्माण झाले आहेत. आदिवासी विकास विभाग या शाळेतील मुलांना वाऱ्यावर सोडून गेलेल्या मुख्याध्यापक, अधीक्षक आणि वर्गशिक्षक यांच्यावर या मृत्यूला जबाबदार असल्याने कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधव करत आहेत.

पोलिस प्रशासन , शाळा प्रशासन अणि व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करील काय? या प्रकरणाची विशेष एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आदिवासी संघटना कडून होत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांंना नियमानुसार जेवण दिले जात नसल्याने शाळेत स्थानिक विद्यार्थी येत नाहीत. त्यामुळे केवळ अनुदान लाटण्यासाठी या शाळेत जिल्ह्या बाहेरील आदिवासी मुले आणली जात आहेत.

आदिवासींच्या निधीवर शाळा व्यवस्थापन डल्ला मारत असल्याने शाळेची मान्यता रद्द करून या शाळेचे शासकीय आश्रम शाळेत रूपांतर करण्याची मागणी सुद्धा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *