ठाणे : केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवरी या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम १४ दिवस राबवण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासंदर्भांत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गीता काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला निर्देशित केले आहे.
समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेवून त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ अखेर ७११ कुष्ठ रुग्णांची नोंद कुष्ठरोग विभागाने केली आहे. वेदना नसल्याने अनेकवेळा रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान करण्यासाठी कुष्ठरोग विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोग विषयी जनजागृती करणे, हे या मोहिमेच मुख्य उद्दीष्ट आहे. या बाबत जिल्हा समन्वय समितीची सभा १३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील मनुष्य बळाची माहिती घेवून त्यानुसार सूक्ष्म कृती आराखडा बनवुन त्याप्रमाणे कुष्ठरोग शोध मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील २६ लाख ८४ हजार ८९४ तर शहरी भागातील १४ लाख ६४ हजार ०४१ निवडलेल्या जोखीम ग्रस्त भागातील एकूण ४१ लाख ४८ हजार ९३५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि मोहिमेचे सर्व स्तरावर प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी २ हजार ५३२ गटांकडून काम करण्यात येणार आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
कुष्ठरोग जिवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत.कानाच्या पळया जाड होणे व चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे. त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखर्या होणे कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.
कुष्ठरोगामुळे येणारी विकृती
Grade I विकृती : यामध्ये तळहाताला किंवा तळपायाला बधिरता येते. संवेदना नसल्याने गरम वस्तु पकडल्याने किंवा काही टोचल्याने तळ हाताला किंवा तळ पायाला जखमा पडु शकतात ज्या वर्षानुवर्षे बसत नाहीत.Grade II विकृती : या प्रकारच्या विकृती डोळ्यांनी दिसण्यासारखी असते जसे की हात पायाची बोटे वाकडी होणे, मनगट लुळे पडणे, पाय लुळा पडणे, तळहाताला तळपायाला जखमा पडणे, डोळ्यांच्या पापण्या पूर्णतः बंद न करता येणे अशा प्रकारच्या विकृती ग्रेड टु च्या कुष्ठरोगमध्ये येते कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून अति जोखमीच्या भागात राहणार्या समाज घटकांना कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.