शिक्षक, मुख्याध्यापकांना मोठा दिलासा
कल्याण : फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होत असलेल्या दहावी बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शिक्षण बोर्डाने घेतला आहे. यासंदर्भात राज्य बोर्डाने परिपत्रक काढले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाल्याची माहिती राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले.
दहावी- बारावी बोर्ड परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेच्या संबंधित व्यक्ती अदलाबदलीचा निर्णय १७ जानेवारी २०२५ रोजी राज्य शिक्षण बोर्डाने घेतला होता. घेतलेला निर्णय शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करणारा व शिक्षकांच्या अडचणी वाढविणारा होता. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा याकरिता प्रथम पुणे येथे शिक्षण आयुक्त यांची परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य कार्याध्यक्ष उमाकांत कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सदर निर्णयामुळे बोर्ड परीक्षावेळी अडचणी निर्माण होतील हे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच शिक्षण मंत्री दादा भूसे यांना मंत्रालयात परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय सातपुते शिष्टमंडळ व कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन १७ जानेवारी २०२५ च्या आदेशावर मंत्रिमहोदयांबरोबर चर्चा केली.
या निर्णयामुळे तांत्रिक अडचण निर्माण होतील हे निदर्शनास आणून दिले. परीक्षा केंद्रांवर त्याच केंद्रातील पर्यवेक्षक,केंद्र संचालक कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे आहे हे लक्षात आणून दिले. त्यावर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रिमहोदयांनी बोलावून चर्चा केल्यानुसार शासनाने हा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक कार्यास यश प्राप्त झाल्यामुळे कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, कोषाध्यक्ष पी. एन.पाटील, उपाध्यक्ष हेमलता मुनोत, राज्याचे कार्याध्यक्ष एकनाथ दळवी यांनी राज्य पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानून मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करत राज्य शिक्षण बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.