अशोक गायकवाड

कर्जत : नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.सोयाबीन, बी. टी.कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्याठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात उत्पादन क्षेत्रात अशी समस्या नसल्याने सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून भाताचा विचार करा, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी येथे केले.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक गट सभेच्या उद् घाटनपर समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक डॉ. नारायण जांभळे, इक्रिसॅट हैद्राबादचे माजी उपमहासंचालक डॉ. अरविंदकुमार , डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर , कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठाचे विस्तार परिषद सदस्य विलास म्हात्रे,सहयोगी संशोधन संचालक आणि भात विशेषज्ञ डॉ.भरत वाघमोडे उपस्थित होते.डॉ.भावे यांनी पुढे बोलताना पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक उपाय अंमलात आणण्यासाठी ” जागतिक स्तरावर विचार करा, स्थानिक पातळीवर काम करा ” असा सल्ला शास्त्रज्ञांना दिला.बाहेरील सुरक्षेसोबत भात उत्पादक शेतकऱ्यांची आंतरिक सुरक्षा अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.भाताखालील जमिनीची किंमत जास्त असून शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालावरून भात पीक गरिबीकडून समृद्धीकडे वाटचाल करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.विद्यापीठाचे बियाणे कमी पडल्याने स्थानिक वाण शेतकऱ्यांकडून घेतले जातात, त्यासाठी शास्त्रज्ञांनी बीजोत्पादन वाढविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.अन्य पिकांना ज्याप्रमाणे शासकीय स्तरावरून भरघोस सुविधा दिल्या जातात त्याच धर्तीवर भाताला राजाश्रय मिळायला हवा, असे मत त्यांनी मांडले.कृषिशी निगडित आपल्या सर्व समस्या आपल्यालाच सोडवाव्या लागतील,हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी सुप्रसिद्ध गजलकार राहत इंदोरी यांचा ” न हम-सफर न किसी हम-नशी से निकलेगा
हमारे पाँव का काँटा हमी से निकलेगा “हा शेर पेश करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.डॉ. वाघमोडे यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांनी स्वतः प्रशस्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन केले.डॉ.जांभळे म्हणाले की, विविध प्रदेशांच्या गरजेनुरूप जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे अधिक असलेल्या भात जाती विकसित करून गरिबी निर्मूलनासाठी भात हे व्यावसायिक पीक होण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी भात क्षेत्र कमी न करता उत्पादन वाढविणे, संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादन वाढविणे तसेच ‘ स्पीड ब्रिडिंग ‘, ‘जिनोम एडिटिंग’, ‘सिंथेटिक अपोमिक्सिस ‘ सारख्या नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.चिखलनी ऐवजी पेरभाताकडे वळणे गरजेचे असून त्यासाठी नवे वेगळे वाण तयार करणे अपरिहार्य आहे, असे ते यावेळी डॉ.हळदवणेकर,डॉ.हळदणकर डॉ.अरविंदकुमार यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकात डॉ.वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील भात संशोधन कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.आभार वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ.पुष्पा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत गायले गेले.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसोबत हैदराबादचे संकरित भाताचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.हरिप्रसाद आणि वाराणसीचे वरिष्ठ भात पैदास शास्त्रज्ञ डॉ.उमा माहेश्वरी सिंग यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.बैठकीला वाराणसीचे भात गुणवत्ता विशेषज्ञ डॉ. सौरव बदौणी आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्सचे जगप्रसिद्ध संकरित भात शास्त्रज्ञ डॉ. जोहर अली हे दुरदृश्य प्रणालीद्वारे व महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठातील भात संशोधनाशी निगडित एकूण ४९ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *