मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. जनमताच्या दबावामुळे तर या प्रकरणातील सूत्रधारांना अटक करण्यात आली. असे असले, तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष यांचा भाऊ धनंजय यांच्या पाठिशी आ. सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार उभे राहिले. विधिमंडळ, संसदेपर्यंत ज्या प्रकरणाची चर्चा झाली, त्या प्रकरणात पडून तोंड पोळून घ्यायचे डॉ. नामदेवशास्त्री यांनी काहीच कारण नव्हते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे कितीही जवळचे असले आणि त्यांनी कितीही आपल्या मनातील भावना सांगितल्या, तरी त्यांची बाजू घेतली, तर ती आपल्या अंगलट येईल, असे महंतांच्या लक्षात कसे आले नाही, हा प्रश्न पडतो. त्याचे कारण यापूर्वीही नामदेवशास्त्री यांच्या परस्परविरोधी भूमिकांची चर्चा झालीच होती. गोपीनाथ मुंडे असताना भगवानगडाचा वापर दसरा मेळाव्यासाठी करू दिला जात होता. दसरा मे‍ळाव्यात गोपीनाथराव पुढच्या राजकारणाची दिशा सांगायचे. भगवानगड हा धार्मिक अधिष्टान असलेला होता. त्याचे वंजारी समाजाच्या दैवतात हळूहळू रुपांतर झाले. खरेतर संतांना जात, धर्म नसतो; परंतु नंतरच्या काही उत्तराधिकाऱ्यांनी संतांना जातीच्या, धर्माच्या जोखडात बांधले. भगवानगडही त्याला अपवाद नव्हता. गोपीनाथरावांच्या निधनानंतर पंकजा ही भगवानगडाची लेक आहे, असे सांगणाऱ्या महंतांनी नंतर मात्र पंकजा यांच्यांशी पंगा घेतला. दसरा मेळावा गडावर घेऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. परळीत पंकजा यांनी गोपीनाथगडाची निर्मिती केल्यानंतर दोघांतील दुरावा वाढला. त्या वेळी नामदेवशास्त्री आणि पंकजा समर्थक फुलचंद कराड यांनी वापरलेली भाषा ही दोन्ही बाजूंनी मर्यादाभंग करणारी होती. अगोदर झाडाप्रमाणे वेल वाढत नाही, असे धनंजय मुंडे यांच्याबाबतीत म्हणारे नामदेवशास्त्री आणि त्यांचे अनुयायी नंतर धनंजय मंत्री झाल्यानंतर त्यांच्या स्वागताला सर्वांत पुढे होते. भगवान गडावरही त्यांचा सत्कार करण्यात आला. पंकजा यांना भगवानगडाचा राजकीय वापर होऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देणारे महंत नंतर मात्र धनंजय यांच्या मात्र निकटवर्तीयांत गेले. आता तर धनंजय यांच्या वाईट काळात त्यांची साथ ते द्यायला तयार झाले. गोपीनाथराव गेल्यानंतर पंकजा एकाकी पडल्या होत्या, त्या वेळी मात्र महंतांनी त्यांना साथ दिली नाही. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कितीही जवळचा असला, तरी संत, महंतांनी त्यांची पाठराखण करायचे काहीच कारण नाही. भगवानगड हा कोणा एकाचा नाही, तो सर्वांचा आहे, असे महंतच सांगत होते. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांचे व्यवसायिक भागीदार खून आणि खंडणीप्रकरणात तुरुंगात आहेत, त्यांच्यावर राजकीय आरोप, चिखलफेक होत असेल, तर ती दूर करण्याची जबाबदारी संबंधित नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची आहे, महंतांची नव्हे; परंतु ते भान महंतांना राहिले नाही.
धनंजय यांच्या पाठीमागे भगवानगडाने आपली ताकद उभी केली आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय यांना पाठिंबा जाहीर केला. या प्रकरणात भगवानगड खंबीरपणे धनंजय यांच्या पाठिशी उभा आहे, असे वक्तव्य करुन नामदेवशास्त्री महाराज यांनी भाजप आणि अजित पवार यांना संदेश दिल्याची चर्चा आहे. धनंजय यांच्या मंत्रि‍पदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावून घ्याल, असा अप्रत्यक्ष इशारा भगवानगडाने दिला. धार्मिक स्थळाचा हा उघडउघड दुरुपयोग आहे. या पत्रकार परिषदेत नामदेवशास्त्री यांनी केलेली काही वक्तव्ये वादाला कारण ठरली. ज्या लोकांनी देशमुख यांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, याचा विचार झाला पाहिजे, असे नामदेवशास्त्री यांनी म्हटले. वास्तविक ‘आवदा’ कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणीत देशमुख आड येत होते. एका दलिताला मारहाण होत असताना त्यांना वाचवायला देशमुख मध्ये पडले. त्यांच्याविषयी राग होता, तर किरकोळ मारहाण करून, त्यांना समजावून सांगून सोडून देता आले असते;परंतु अतिशय निर्दयीपणे खून करण्यात आला. खून करून आरोपी एकमेकांसोबत पळून गेले. पुरावा नष्ट करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर संघटित गुन्हेगारीचे हे कृत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला. आरोपी कोठडीची हवा खात आहेत. याचा अर्थ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महंतांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांची भलामण करावी, हा न्यायलयाच्या कामकाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. देशमुख यांचा एकट्याचाच नव्हे, तर बीडमधील अनेक सामान्य जणांचा या टोळीने खून केला असण्याची शक्यता असून तसे आरोप होत आहेत. अशा वेळी या टोळीतील बहुतांश लोक एका समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्याविषयी कणव बाळगली जात असेल, तर ते सर्वथा चुकीचे आहे. बीडमध्ये महादेव मुंडे यांच्यासह वंजारी समाजातील अनेकांची हत्या झाली असताना महंतांना त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता दिसली नाही आणि देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची दिसली. धनंजय मुंडे यांच्यांशी चर्चा केल्यानंतर महंत यांनी, ‘आमच्या दोघांची राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक विषयावर चर्चा झाली. त्यांच्या मानसिकतेचा आम्ही आढावा घेतला. सगळे समजून घेतल्यानंतर मला असे जाणवले ,की इतक्या वर्षापासून ते आमच्या जवळ आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. सगळ्या नेत्यांसोबत ते राहिलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचे मोठे नुकसान झाले आहे,’ हे त्यांचे वक्तव्य पाहिले, तर महाराज स्वतःला एका समाजापुरते संकुचित करू पाहत आहेत, हे स्पष्ट दिसते.
हत्या करणाऱ्यांची मानसिकता का बिघडली, हे दाखवण्यास सांगणाऱ्या महाराजांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी होती. एकदा तरी त्यांनी देशमुख कुटुंबाचे सांत्वन करायला हवे होते. देशमुख स्वतः वारकरी संप्रदायाचे. त्यांची हत्या झाली, म्हणजे आपल्या एका शिष्याची हत्या झाली, असे महंतांना वाटायला हवे होते. देशमुख यांच्या हत्येला एका गावापुरते मर्यादित ठेवण्याचा सल्ला ते देतात. धनंजय यांची बाजू घेताना महंतांच्या तोंडून जी वाक्ये निघाली, त्यातून त्यांचीच मानसिकता स्पष्ट होते. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर जेव्हा टीका झाली आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आणि संतोष यांची मुलगी वैभवी यांनी जेव्हा भगवानगडावर जाऊन त्यांना काही पुरावे दाखवले आणि काही प्रश्न विचारले, तेव्हा त्यातील गांभीर्य त्यांच्या लक्षात आले असावे. त्यानंतर कसलेल्या राजकारण्यांसारखे ते माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, मला तसे म्हणायचे नव्हते, मी आरोपींसोबत नाही, तर देशमुख कुटुंबीयांसोबत आहे, त्यांचे प्रकरण जलदगती न्यायलयात चालवावे, अशी उपरतीची भाषा त्यांनी केली. त्यांचा हा ‘यू टर्न’ राजकारण्यांसारखाच आहे. राजकारण्यांसोबत महंत, साधू,संत राहायला लागले, की काय होते, याचा हा नमुना. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सगळ्याचा समाजावर आणि वारकरी संप्रदायावर भयानक परिणाम झाला आहे, असे महाराज म्हणाले होते. धनंजय यांच्यावरील आरोपाचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध, असे विचारले, तर त्यावर उत्तर असणार नाही. कोणत्याही धर्मपीठावर राजकारण्यांनी अधिकार गाजवू नये. धर्मपीठ पवित्र असते. राजकारणी कसे असतात, हे सर्वांना माहिती आहे, असे सांगणारे नामदेवशास्त्रीच एका राजकारण्याची भलामण करतात, तेव्हा आपण पूर्वी काय बोललो होतो, हे त्यांना आठवत नसेल, तर आता यूट्युब, फेसबुकसह अन्य समाजमाध्यमातून केव्हाही आठवण करून देते आणि त्यातून आपलीच गोची होते, हे महंतांना यातून कळायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *