मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, सीईएस मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील भोसले, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा सोहम जाधव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची केतकी मुंडल्ये, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण आदींनी विजयीदौड केली. सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत विश्वेत बिजोतकरने सध्या फॉर्मात असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या पुष्कर गोळेचे आव्हान १५-० असे संपुष्टात आणले आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे उद्घाटन समितीचे कार्यवाह डॉ. अरुण भुरे, विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसरात सुरु झालेल्या शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूलच्या प्रसन्न गोळेने निखील भोसले विरुध्द पहिला बोर्ड ५-० असा घेत दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर निखील भोसलेने सावध व अचूक खेळ करीत प्रसन्नला १०-५ असे चकविले. सोहम जाधवने प्रथमपासून आक्रमक खेळ करीत अद्वैत पालांडेला ११-० असे नमविले. अन्य सामन्यात केतकी मुंडल्येने श्रिया पवारचा २३-२ असा, उमैर पठाणने अनय चीनीवारचा ११-१ असा, ध्रुव भालेरावने सोहम सोनावणेचा १४-१ असा, तनया दळवीने धर्मी शुक्लाचा १४-० असा, केवल कुळकर्णीने शिवांश मोरेचा ९-८ असा आणि ग्रीष्मा धामणकरने महेक सय्यदचा २१-० असा पराभव केला. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे. समितीतर्फे माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त मोफत क्रीडा उपक्रम आयोजित करून सर्व सहभागी खेळाडूंना टी शर्ट व अल्पोपहार देण्यात आला.
