वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका

– दोनशे मीटर्सनंतर चारशे मीटर्समध्येही जिंकले सुवर्ण

हल्दवानी : महाराष्ट्राच्या सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २०० मीटर्स शर्यतीतही सोनेरी कामगिरी केली. याआधी तिने याच स्पर्धेमध्ये ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकाखेरीज महाराष्ट्राने जलतरणामध्ये तीन कांस्यपदके, तर डायव्हिंगमध्येही एक कास्यपदक जिंकले.
सान्वी देशवाल हिने दोनशे मीटर्स शर्यत दोन मिनिटे २४.९० सेकंदात पार केली. या शर्यतीमध्ये तिने ब्रेस्ट स्ट्रोक, बॅकस्टोक, बटरफ्लाय व फ्री स्टाईल या चारही शैलीमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले आजच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकण्याबाबत मला आत्मविश्वास होता. तरीही मी या शर्यतीबाबत योग्य नियोजन केले होते, आणि त्यानुसारच माझी कामगिरी झाली. ४०० मीटर्स पाठोपाठ आजची शर्यत जिंकल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे, असे सान्वी देशवाल हिने सांगितले.
महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने ४०० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक पटकावले. हे अंतर पार करण्यास तिला चार मिनिटे ३५.३४ सेकंद वेळ लागला. तिची सहकारी ऋतुजा राजाज्ञ हिने आपल्या नावावर आणखी एका कांस्य पदकाची नोंद केली. तिने ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत ३१.५० सेकंदात पार केली. पुरुषांच्या ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने कांस्यपदकाची कमाई केली. त्याला हे अंतर पार करण्यास २६.४५ सेकंद वेळ लागला.
महिलांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या क्षमा बंगेरा हिला कांस्यपदक मिळाले. तिने १४७.१५ गुणांची नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *