ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वर्तकनगर प्रभाग समितीच्या क्षेत्रात असलेल्या रेमण्ड परिसरात, ठाणे महापालिका मुख्यालयाच्या ३२ मजली, भव्यदिव्य अशा नवीन इमारतीची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजूर केलेला आहे. सदर मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या सुविधा भूखंडावर उद्यानाचे आरक्षण असतानाही, ठाणे महानगरपालिकेने वृक्षतोडीचा हा पर्यावरणविरोधी प्रस्ताव पुढे आणलेला आहे. यासंदर्भात, वृक्षांची बेदरकारपणे कत्तल करण्याला, ठाणेकर नागरिकांचा, विशेषतः रेमण्ड परिसरातील रहिवाशांचा कडाडून विरोध आहे. मुळात मुख्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या ठिकाणी असलेली तब्बल २,०९७ झाडे तोडण्याचा मनसुबा, महापालिका प्रशासनाने आखलेला होता. त्याअनुषंगाने आणखी २,०९७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा दावा ठामपाने केला असला तरी, दुसरीकडे ६३१ वृक्षही तोडले जाणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, याप्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आली असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांना पत्र लिहून, ठामपाच्या नवीन मुख्यालयाच्या इमारतीसाठी, प्रस्तावित वृक्षतोडीस “भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष” या नात्याने, ‘धर्मराज्य पक्षा’चा विरोध असल्याचे ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका रेमण्ड कंपनीच्या जागेवर, ठाणेकर नागरिकांना कायद्यानुसार मिळालेल्या सुविधा भूखंडावर, महापालिका प्रशासकीय भावनाची जी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे, तिचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालेले असले तरी, सदर प्रस्तावित प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी, महाराष्ट्र महानगर कायद्याअंतर्गत, अत्यावश्यक व प्राथमिक बाबी, बगीचा आणि पाण्याच्या टाकीचे सुरु असलेले बांधकाम थांबवून, राखीव असलेले प्रयोजन बदलून, नागरी हक्काला तिलांजली देण्यात आल्याचा आरोप नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रातून केला आहे. यासंदर्भात, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना, ३० जानेवारी २०२५ रोजी, पत्र पाठवून, ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी कापल्या जाणाऱ्या वृक्षतोडीस आणि सुविधा भूखंडावरील अतिक्रमणास ठामपणे विरोध दर्शविलेला आहे. ठाणे शहरातील पोखरण रस्त्यावरील हा संपूर्ण परिसर, निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो. इथल्याच रेमण्ड कंपनीच्या आठ एकर जागेत, ठाणे महानगरपालिकेची नवीन इमारत उभारली जाणार आहे. या जागेत सध्या २,९५६ वृक्ष आहेत, त्यातील २,०९७ वृक्ष तोडले जाणार आहेत. या तोडल्या जाणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा, महापालिका प्रशासनाने केलेला असला आणि त्याची पुरेपूर हमी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली असली तरी, यापूर्वी ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे, त्यातील एकही झाड जगलेले नाही, याकडे नितीन देशपांडे यांनी, मुख्य सचिवांचे लक्ष वेधलेले आहे. मुळात निसर्गाचा ऱ्हास करण्याचे पातक, ठाणे महानगरपालिका प्रशासन करीत असून, ठामपाच्या नवीन मुख्यालयाच्या इमारतीच्या माध्यमातून, सुविधा भूखंडावरील अतिक्रमणाची सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी ‘धर्मराज पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडे आपल्या पत्राच्या शेवटी ठामपणे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *