अशोक गायकवाड
नवी मुंबई :नागरिकांची महानगरपालिकेशी संबधित कामे विहित कालावधीत सहजपणे व्हावीत याकरिता समाधानकारक प्रशासकीय कामकाज करण्याच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये शून्य प्रलंबितता हे लक्ष्य ठेवून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजात सुनियोजितता असावी व कार्यालयांमधील कागदपत्रे व नस्ती यांचा अभिलेख शासन नियमांनुसार योग्यप्रकारे जतन व्हावा याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील टपाल स्विकृती व वितरण, नस्ती सादरीकरण, दप्तर सहा बंडल पध्दतीने ठेवणे याबाबत तसेच प्राप्त पत्रावर करावयाची कार्यवाही, त्याची वर्गीकरण पध्दती व अभिलेख कक्षात दप्तर पाठविणे आणि तो अभिलेख जतन कार्यपध्दती अशा कार्यालयीन कामकाजातील बाबींवर सत्यजित बडे यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांच्या या बाबतच्या शंकांचे निरसनही केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कार्यालयीन कामकाजात सहा गठ्ठे पध्दतीने विगतवारी करण्याचे महत्व पटवून सांगताना यामुळे कोणताही संदर्भीत पत्रव्यवहार व नस्ती अत्यल्प कालावधीत उपलब्ध होण्यास मदत होते हे उदाहरणे देत पटवून दिले. या प्रशिक्षणाचा उपयोग महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आपल्या दैनंदिन कामकाजात करतील आणि यामुळे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दिवसांच्या कृती आराखडयातील सात कलमांनुसार प्रभावी कार्यवाही करण्यास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली असून या प्रशिक्षणामुळे या कार्यवाहीला अधिक गती येईल.