नुकतेच अमेरिकेत सत्तांतर झाले. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी आपले नवे कायदे करून राबवणे सुरू केले. त्यात त्यांनी स्थलांतरित परदेशी नागरिकांना आपल्या देशात परत पाठवायला सुरुवात केली. त्यातही जे अवैध स्थलांतरित होते त्यांच्यावर ट्रम्प यांचा पहिले डोळा होता.
ट्रम्प यांच्या योजनेनुसार सर्वच देशातले अवैध स्थलांतरित आपापल्या मायदेशी पाठवणं सुरू केले. दोन दिवसापूर्वीच भारतातील १०४ अवैधरित्या अमेरिकेत राहणारे नागरिक परत आणून सोडले गेले. त्यांना एखाद्या कैद्याप्रमाणे हातापायाला साखळदंड बांधून विमानातून आणण्यात आले होते. या अवैध स्थलांतरितांनी भारतात आल्यावर आपोबिती सांगितली. आणि देशातील विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आपल्या देशातील नागरिकांना अशी वागणूक का दिली गेली हा त्यांचा सवाल होता.
माझ्या माहितीनुसार अमेरिकेतून अशा प्रकारे अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरित भारतीयांना मायदेशी पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही किमान दोन तीन वेळा अशाप्रकारे अवैध स्थलांतरित भारतात परत पाठविले गेले आहेत.
इथे माझ्या मनात प्रश्न असा येतो की मुळात या भारतीयांनी अवैधरित्या अमेरिकेत जाऊन वास्तव्य करण्याची गरजच काय? तुम्हाला भारत सोडून परदेशात जायचे असेल तर त्यासाठी कायदे आहेत. विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करूनच तुम्हाला जावे लागते. जसे आपल्या देशाचे परदेशी जाण्यासाठी कायदे आहेत, तसेच परदेशातही इतर देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कायदे आहेत. आपल्या देशातून परदेशात जायचे तर त्यासाठी आधी परदेशी जाण्याचा तसा पासपोर्ट बनवून घ्यावा लागतो. पासपोर्ट बनल्यावर नंतर ज्या देशात जायचे त्या देशाचा व्हिसा मिळवावा लागतो. हा व्हिसा तिथल्या सरकारच्या परवानगीनेच तुम्हाला मिळतो. म्हणजेच तिथे तुम्ही ठराविक काळासाठी वास्तव्य करण्यासाठी त्या देशाची रीतसर परवानगी लागते. जर तुम्हाला देश सोडून परदेशातच कायमचे स्थायिक व्हायचे असेल तरी त्या देशातील सरकारची परवानगी घेऊन तिथले नागरिकत्व मिळवावे लागते. तरच तुम्ही तिथे वास्तव्य करू शकता. जर तुम्ही या प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत आणि तरीही आडमार्गाने परदेशी गेलात,तर तुम्ही तिथले अवैध स्थलांतरितच ठरता. अशा परिस्थितीत त्या देशातील कायद्यानुसार तुम्हाला शिक्षाही केली जाऊ शकते, आणि प्रसंगी जसे यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवले तसे भारतातही पाठवले जाऊ शकते. जर तुम्हाला परदेशात जायचेच असेल तर या प्रक्रिया पूर्ण करून जाणे केव्हाही इष्ट ठरते.
गेल्या काही वर्षात आपल्या देशातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांना परदेशी जाण्याची आणि तिकडेच स्थायिक होण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. मुले शिक्षणासाठी म्हणून तिथे जातात. मग तिथेच नोकरी बघतात, लग्न करायचे झाले तर त्यांना बायको मात्र भारतीय हवी असते. भारतीय बायकोला ते परदेशात घेऊन गेले की मग नवरा-बायको तिकडलेच होतात. त्यांना तिथल्या नागरिकत्वाची ओढ लागते. गेल्या जवळजवळ साठ वर्षात आपल्या महाराष्ट्रातीलच कितीतरी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण-तरुणी अशाच पद्धतीने परदेशी जाऊन तिथेच स्थायिक झाले आहेत. परिणामी अमेरिकेत कमला हॅरीस किंवा मग ब्रिटनमध्ये ऋषी सुनक हे सत्तेचे दावेदारही बनले आहेत. त्यामुळे असे स्थलांतरित मग तिथलेच नागरिक बनतात आणि पुढे जाऊन तिथल्याच कुटुंबातला जोडीदार शोधतात. त्यांना भारताविषयी आणि इथल्या नातलगांविषयी काहीही वाटत नाही.
अशा जोडप्यांशी मुले तर जाऊ द्या, पण या जोडप्यांना तरी कुठे आपल्या भारतीय नातलगांबद्दल ओढ असते? माझ्याच परिचयातील आणि नात्यातीलही अनेक कुटुंबात मी हा प्रकार पाहिला आहे. ही मुले परदेशी गेली की आई वडिलांचे आजारपण तर सोडा, पण त्यांच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी यायला त्यांना वेळ नसतो. नातलगांकडे लग्न, मौंज, यासाठी तर ते कधीच वेळ काढत नाहीत.
तरीही आपल्या अनेक मध्यमवर्गीय भारतीयांना परदेशी जाण्याचीच कायम ओढ असते. आजही कितीतरी कुटुंबात एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुले किंवा दोन्ही मुली असेच चित्र दिसते. आता तर अनेक कुटुंबांमध्ये एकच मुल असते. मात्र या मुलाला शिक्षणासाठीच परदेशी पाठवायचे असे मायबापांचे स्वप्न असते. खरे तर भारतातही दर्जेदार शिक्षण मिळते. मात्र परदेशी जाऊन शिक्षण घेतले म्हणजे डोक्यावर शिंगे फुटली असेच मायबापांना वाटत असते.
यासाठी परदेशात मिळणारा रगड पैसा हा देखील कारणीभूत असतो. तसेच आपल्या देशातील एकूणच समाजव्यवस्था ही देखील त्यासाठी कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपल्या देशात शिक्षण आणि त्यानंतर मिळणाऱ्या नोकऱ्या, त्यातील पदोन्नती या सर्वच बाबींसाठी आरक्षणाचे भूत नको तिथे बोकाळलेले आहे. परिणामी ज्या जाती-जमातीत आरक्षण उपलब्ध नाही अशा गुणीजनांचा या देशात निश्चितच कोंडमारा होतो. मग अशा परिस्थितीत काय या देशात राहायचे अशी भावनाही मनात डोकावू लागते. त्यातून अनेक मुले आधी शिक्षणासाठी आणि शिक्षण भारतात झाले तर रोजगारासाठी परदेशात धाव घेतात. सुरुवातीला परदेशात काही वर्ष राहून पैसा कमाऊ आणि भारतात येऊ असा विचार करून परदेशी गेलेले तरुण मग तिकडचेच होतात. आरक्षणाबरोबरच आज आपल्या देशात भ्रष्टाचारही नको तितका बोकाळला आहे. कुठेही तुम्ही लायक असलात तरी तुमचे रास्त कामही चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही, असा अनुभव आल्यावर नवी पिढी हा देश सोडूनच जाऊया असा विचार करत असेल, तर त्यात चुकीचे काय?
यासाठी आपल्या देशात नव्या पिढीला शिक्षणाच्या आणि पुढे नोकरीच्या चांगल्या संधी वेळीच उपलब्ध व्हायला हव्यात. त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावर असलेला भ्रष्टाचारही संपायला हवा. त्यासाठी समाजाची मानसिकताच बदलायला हवी. त्याचबरोबर अनेक कुटुंबांना परदेशी जाण्याची क्रेझ असते. आपला मुलगा किंवा मुलगी परदेशात गेला आणि तिकडेच त्याला नोकरी मिळाली हे सांगताना त्यांना आपले स्टेटस वाढल्याची भावना निर्माण होते. त्यासाठी मग ते जीवाचे रान करतात आणि मुलांना कसेही करून परदेशात पाठवायचे हे ठरवूनच कामाला लागतात. ही मानसिकता देखील कुठेतरी बदलायला हवी. परदेशात जाऊनच तुमचे स्टेटस वाढते असे नाही. आपल्या देशातही चांगले शिक्षण उपलब्ध आहे. हे शिक्षण घेऊन देखील तुम्ही समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळवू शकता, ही भावना समाजाच्या मनात रुजवली जायला हवी.
आज भारतातील दर पाच घरांमागे एका घरचे कोणीतरी परदेशात स्थायिक झालेले दिसते. ही परिस्थिती काही सुखावह नाही. आज जन्माला आलेले मुल पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत भारतात शिकते. त्यावेळी त्याच्यावर सरकारचा म्हणजेच समाजाचा पैसाही खर्च होत असतो. हा खर्च करून तयार झालेली ही तरुणाई परदेशात जाते आणि आपल्या ज्ञानाचा फायदा परदेशातल्या सरकारला देते. आपल्या हाती मात्र मोठे शून्य येते.
ही परिस्थिती बदलायलाच हवी. त्यासाठी समाजानेच प्रयत्न करायला हवे. प्रसंगी उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीतील गरज म्हणून काही काळ तुम्ही परदेशात गेलात ते मान्य. मात्र कायमस्वरूपी परदेशात जाऊन तिकडलेच होणे हे चुकीचेच ठरते. त्यात मग कसेही करून परदेशात जायचे, मग रास्त मार्गाने जमले नाही तर चुकीच्या मार्गाने जायचे हे योग्य नाही, याची जाणीव प्रत्येकालाच व्हायला हवी. अशी जाणीव झाली तरच परदेशात जाण्याचे आणि तिकडचेच होण्याचे हे फॅड आपसूकच कमी होईल. आपण शिक्षण देऊन तयार केलेल्या तरुणाईला जर इथेच रोजगार मिळाला, तर ती इथेच राहील आणि देशाच्या विकासात आणि जडणघडणीत ती मोलाचे योगदान देईल हे नक्की. याचा सर्वच समाज घटकांनी आजच विचार करायला हवा. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.
अविनाश पाठक
