Month: February 2025

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

ठाणे : केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवरी या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये…

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द

 शिक्षक, मुख्याध्यापकांना मोठा दिलासा कल्याण :  फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होत असलेल्या दहावी बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शिक्षण बोर्डाने घेतला…

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आजच्या स्त्रियांनी अंगीकारणे ही काळाची गरज

ठाणे : जगाच्या इतिहासाची पाने चाळत असताना अनेक राजे महाराजे यांचे विविध चरित्र आपणास इतिहासात दिसून येतात यात अनेक स्त्रियांचे योगदानही मोलाचे दिसून येते. काही स्त्रियांनी इतिहास निर्माण करणारे योद्धे घडवली तर काही स्त्रियांनी स्वकर्तृत्वानेच इतिहास घडविलेला दिसतो. याचेच जगाच्या पाठीवरचे ज्वलंत, दैदिप्यमान, नेत्रदीपक उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांचं अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिलांनी अंगीकारणे हीच काळाची  गरज असल्याचे प्रतिपादन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक,मासुंदा तलाव ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने रविवारी संध्याकाळी पाच ते सात या वेळामध्ये हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने हळदी कुंकू समारंभात उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात डॉ प्रतीक्षा बोर्डे बोलत होत्या.या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे,रूपाली शिंदे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा अध्यक्षा माधवी बारगीर,सचिव गायत्री गुंड, संगिता खटावकर,सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, मीना कवितके, सुजाता भांड,मनीषा शेळके,स्मिता गावडे,अमृता बुधे,शीतल डफळ आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना प्रतीक्षा बोर्डे म्हणाल्या की आजही एकविसाव्या शतकातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत याचा अभिमान वाटतो. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, खेळ, इत्यादी सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.आजच्या महिलांनी  आपल्या पाल्ल्यांना कार्टून चॅनल दाखवून  भविष्य काळातील जोकर  घडवण्या पेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  क्रांतिकारी विचार बालकांच्या मनावर बिंबवले तर पुढील पिढया कडून आपण खूप मोठ्या क्रांतिकारी इतिहासाची अपेक्षा ठेऊ शकतो. माता हीच बालकाची पहिली गुरु असते .ज्याप्रमाणे अहिल्याबाईंनी त्यांच्या समोर  उभ्या असलेल्या असंख्य संकटाचा सामना मोठ्या धैर्याने केला.याकामी त्यांना त्यांनी वाचन केलेले धर्मग्रंथ महापुरुषांचे चरित्र कामी आले . आजच्या स्त्रियांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई चे  विचार आत्मसात करणे,समाज उपयोगी विचारांचा प्रसार,प्रचार करणे, अनावश्यक (घातक)  पाश्चात्य संस्कृती टाळून ,भारतीय संस्कृती अंगीकारणे  हीच काळजी गरज असल्याचे मार्गदर्शन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी उपस्थित महिलांना केले.

तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान राजेंद्र साळसकर मुंबई : मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मुलुंड (पूर्व) येथील आर्यावर्त इंद्रप्रस्थ को. ऑप. सोसायटीतील रहिवाशांनी कोणत्याही बँकेचे आर्थिक पाठबळ न घेता स्वयंपुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे. या इमारतीतील रहिवाशांना आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत चावी वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी  विकास महात्मे, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी, सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, सचिव विशाल मारकड, खजिनदार रत्नाकर वरळीकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले कि, आज तुमच्याकडून आम्ही शिकायला आलोय. हे सगळं शिक्षण पुढे प्रचारीत, प्रसारित करणं म्हणजे घरांची चळवळ आणि ती मराठी माणसांच्या घरांची चळवळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसाच्या घराची, कुटुंबाची चिंता असते म्हणून ते शासन निर्णय काढतात. शेलार पुढे म्हणाले कि,मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार आहे. तसेच तुमच्या ज्या काही नवीन सूचना आल्या आहेत त्या शंभर टक्के नवीन अध्यादेशात घालू. पण ही चळवळ वृद्धिंगत होवो. तुमचे कार्य अनेकांना प्रेरणा देईल, असेही आ. शेलार यांनी म्हटले. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, मुंबईत स्वयंपुनर्विकास व्हावा हा माझा अट्टाहास होता. गेली १५ वर्ष मी यावर काम करतोय. मुंबईत मध्यमवर्गीय सर्वसामान्य मराठी माणसासाठी स्वयंपुनर्विकास हा दिशादर्शक आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच स्वयंपुनर्विकास गतीने होताना दिसतोय. मुंबई जिल्हा बँकेकडे १६०० प्रस्ताव आलेत. त्यातील ३६ प्रकल्पाना कर्जमंजुर केले असून १४ इमारतींमध्ये लोकं राहायला गेली आहेत. पुढील आठवड्यात चारकोप येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्री यांना घेऊन जाणार आहे. गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत स्वयंपुनर्विकासासाठी १८ मागण्या केल्या होत्या त्यापैकी १६ शासन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काढण्यास सांगितले. आता राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी रूपये आणि एनसीडीसीकडून एक हजार कोटी मुंबई बँकेला मिळणार आहेत. त्यातून मुंबईतील स्वयंपुनर्विकास होणार आहे. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन काढावे आणि हे अभियान मुंबई पुरते न राहता नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी जावे व गरिबाला घर मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असल्याचे दरेकरांनी सांगितले. आशिष शेलार आपण मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहात. मुंबईचे अध्यक्ष आहात. तुम्ही पुढाकार घेतलात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपलाही आशीर्वाद या स्वयंपुनर्विकासाला लाभला तर मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला चांगले घर मिळू शकते. सर्वार्थाने मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास महत्वाचा आहे. हे अभियान आणखी ताकदीने पुढे जावे यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी आशिष शेलार यांना केली.

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘इस्लामपूर’ शाखेची ‘व्हाय नॉट’ एकांकिका प्रथम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न कल्याण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. इस्लामपूर शाखेची ‘व्हाय नॉट’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. नवी मुंबई शाखेच्या ‘राडा’ या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर बीड शाखेच्या ‘विच्छेदन’ या एकांकिकेस उत्तम तर सोलापूर महानगर शाखेच्या ‘दोरखंड’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सहकार्यवाह सुनिल ढगे, नियामक मंडळ सदस्य तथा स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक इस्लामपूर शाखेचे अभिषेक पवार, श्रेया माने, उत्कृष्ट दिग्दर्शन बीड शाखेचे मनोज जाधव तर उत्तम दिग्दर्शक पारितोषिक नवी मुंबई शाखेचे षण्मुखानंद आवटे यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सौमित्र कागलकर व सोनाली मुसळे इस्लामपूर शाखा यांना तर उत्कृष्ट अभिनयासाठी अनंत साळवी नवी मुंबई शाखा व गायत्री गायकवाड, नाशिक यांना तर उत्तम अभिनयासाठी अभिषेक इनकर बीड शाखा व भावना चौधरी, नागपूर शाखा यांना पारितोषिक देण्यात आले. तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र श्रेया माने व रविंद्र वाडकर यांना देण्यात आले. नेपथ्यसाठी सर्वोत्कृष्ट सोमनाथ लोखंडे (सोलापूर महानगर शाखा), उत्कृष्ट नेपथ्य शरद भांगरे (बीड शाखा), उत्तम नेपथ्य प्रतिक विसपुते (नाशिक शाखा) तर प्रकाश योजनेसाठी उत्तम पारितोषिक ऋषभ धापोडकर (नागपूर), उत्कृष्ट पारितोषिक दीपक देसाई (नवी मुंबई) तर सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पारितोषिक नितेश फुलारी (सोलापूर महानगर शाखा) यांना देण्यात आले. पार्श्वसंगीत उत्तम पारितोषिक किरण सहाणे (नवी मुंबई), उत्कृष्ट पारितोषिक ओम देशमुख (नाशिक) तर पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पारितोषिक साक्षी करनाळे (इस्लामपूर) यांना देण्यात आले. या स्पर्धेत १६ शाखांनी भाग घेतला होता. या अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण रविंद्र पाथरे, अभिनेत्री आदिती सारंगधर व मिलिंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाट्य परिषदेचे कर्मचारी विशाल सदाफुले यांनी केले तर आभार स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

परीक्षेची भीती बाळगू नका –  गुलाबराव पाटील

तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्याना मार्गदर्शन कल्याण : 11 फेब्रुवारीला बारावी तर 21 फेब्रुवारी पासून दहावी स्टेट बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. कल्याण पूर्वेत माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी दहावी बारावी नंतर काय.? करिअर मार्गदर्शन व बोर्ड परीक्षेची भीती कमी व्हावी याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच करियर मार्गदर्शन पुस्तिका व बोर्ड परीक्षेकरिता मोफत साहित्य दिले जाते.  यावर्षी देखील आमदार सुलभा गायकवाड यांच्यामार्फत तिसगाव तिसाई मंदिराच्या परिसरात मार्गदर्शन व परीक्षेकारिता मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,  दहावी बारावी पास होणे फार सोपे आहे अंतर्गत मूल्यमापनात शाळांकडून विद्यार्थ्यांना समाधानकारक  गुण दिले जातात. लेखी परीक्षेत मोजकेच गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होतात. बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात एक दिवसाआड पेपर असल्यामुळे अभ्यासाला देखील वेळ मिळतो सर्व विषय पास आहे, एका विषयात कमी गुण आहेत अशावेळी बोर्ड आपल्याला बोनस गुण देत असते. म्हणून पास होणे फार सोपे आहे परीक्षेची भीती बाळगू  नका. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन  गुणवत्तेनुसार गुण मिळवा असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्याना केले. पालकांना सुद्धा सांगणे आहे आपल्या मुलांवर टक्केवारीचे ओझे लादू नका. त्यांच्या कुवती प्रमाणे त्यांना गुण मिळवू द्या. काठावर पास झाला तरी त्याला कॉलेजला प्रवेश मिळणारच आहे. असेही गुलाबराव पाटील म्हणाले.  कार्यक्रमाला 1800 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. एमकेसीएलचे प्रवक्ते सुरेश जाधव, नीट आयआयटी लेक्चरर विवेक शर्मा यांचेही दहावी बारावीनंतर काय.? यावर मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांना करियर  मार्गदर्शन पुस्तिका आणि परीक्षेकरिता शैक्षणिक साहित्य मोफत आमदार सुलभा गायकवाड व  शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अमित धानजी, मनोज माळी, प्रमोद माने, विशाल जोगदंड, दिपक गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ऐटम यांनी केले तर आभार अविनाश ओंबासे यांनी मानले.

माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणच्या दत्त मंदिरात साकारली केदारनाथ धामची प्रतिकृती

कल्याण : कल्याण पश्चिमेत जवळ जवळ ७० वर्षे अविरत पणे उत्सव साजरा करत असलेले जुने २ माघी गणेशोत्सव पैकी एक म्हणजेच दत्त आळी मित्र मंडळाचा बाप्पा. यंदा या ठिकाणी केदारनाथ धामची प्रतिकृती साकारण्यात आली असून यंदाची सजावट संकल्पना सारंग केळकर यांनी केली आहे. तर मूर्ती गणेश गव्हाणकर यांनी केली आहे.    

मंजुनाथ महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन

कल्याण : १ ते ७ फेब्रुवारी वनवणवा सप्ताह साजरा करून सर्वत्र जनजागृती केली जाते. जंगलातील मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक कारणांमुळे आग लागण्याचे घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. जंगलाला आग लागून झाडं नाहीसे होत आहेत त्यावर अवलंबून असलेली पक्षांची घरटी, ढोली व त्यांची अंडी थोडक्यात वन्यजीवन आणि वनसंपदा नष्ट होऊन वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ठाकुर्ली येथील मंजुनाथ महाविद्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर वनवणवा, आगीची कारणे, साहित्यांचे आधारे आग विझविणे इ. यासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच प्रथोमचार पेटी मधील त्रिकोणी पट्टी, बॅडेजचा वापर करणे, कृत्रिम पद्धतीने स्ट्रेचर बनविणे याविषयावर वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी प्राध्यापिका निशा देवधर, माधुरी महाराव तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक,  विद्यार्थी  वर्ग, शिक्षकवृंद व महाविद्यालयीन अन्य कर्मचारी उपस्थीत असल्याची माहिती प्रशिक्षण मार्गदर्शक  सुहास पवार यांनी दिली.

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. १ फेब्रुवायेथील विविध ठिकाणी जवळपास पंचवीस गणेशमूर्तींची यानिमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माथेरान हे एक छोटेसे गाव असल्याने ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला.दि.२ रोजी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मुले ,मुली महिलांनी बेभान होऊन नाचत निरोप देण्यासाठी मिरवणुकीत भाविकांनी गर्दी केली होती.येथील शारलोट तलावात विसर्जन करण्यात आले.परंतु नेहमीप्रमाणेच बत्ती गुल असल्याने याभागातून बाप्पाना अंधारात मार्गक्रमण करावे लागले.

सानपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

नवी मुंबई : नवीन मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ च्या हुतात्मा बाबू गेनू सैद गणेश मैदानावर  गणेश जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा  मंडळाच्या वतीने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आळंदीचे ह.भ.प. श्री. महादेव महाराज पैठणकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान  ह. भ. प. श्री.  अनिल महाराज पाटील,  ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज निंबोळे,  ह. भ. प. श्री. शंकर महाराज मोरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, ह. भ. प. श्री. देवेंद्र महाराज निढाळकर, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,  ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काकडे,  या मान्यवर महाराजांची आध्यात्मिक ज्ञानदानाची किर्तनरुपी सेवा झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. श्री. बाळू महाराज औटी व  ह. भ. प. श्री. मनोहर महाराज लांडे यांनी केले, तर दैनंदिन पूजा व्यवस्था सर्वश्री. रघुनाथ कवडे, ज्ञानेश्वर डोंगरे, शरद घोलप, अशोक घाडगे यांनी केली. या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी देणगी देऊन  सहकार्य केले. भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजनबद्ध  असा सुंदर कार्यक्रम झाला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते.