अंबरनाथमध्ये पोलिसांचा
कडेकोट बंदोबस्त
ठाणे : अंबरनाथ नगर परिषदेचे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सुरक्षा आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त लागू केला आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर प्रवेश बंदी असेल. तसेच सुमारे १८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंबरनाथमध्ये तैनात असणार आहे. तर ४० ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
अंबरनाथ नगर परिषदेसाठी येत्या २० डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्यात महापालिका निवडणूकांसाठी युतीची चर्चा सुरु असली तरी अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी अंबरनाथमध्ये प्रचारसभा घेण्यासाठी येण्यापूर्वीच मध्यरात्री भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा सुरु आहे.
मतदान अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आता ठाणे पोलीस या ठिकाणी १ हजार स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच ८०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी असा १८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करणार आहेत. मतदान केंद्र परिसरात १०० मीटर अंतरावर प्रवेशबंदी आहे. तीन उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांकडूनही पाहणी केली जाणार आहे. तसेच आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेशही लागू झाले आहे.
