कल्याणमध्ये मनसेला शिंदेंचा दणका
राज्य सरचिटणीस कौस्तुभ देसाई एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
मनसे कल्याण महिला शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाईही शिंदे सेनेत
ठाणे : कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला खिंडार पाडले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मनसेचे राज्य सरचिटणीस कौस्तुभ देसाई तसेच मनसे कल्याण महिला शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवली परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विविध सामाजिक घटकांपर्यंत पक्षाचा प्रभाव पोहचत आहे. अनुभवी माजी नगरसेवक, काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि मनसेचे शहर पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील झाल्याने शहरातील विकास कामांना अधिक गती मिळणार आहे. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा मोठा लाभ पक्षाला होणार असून आता महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार याप्रसंगी शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिम जिल्हाप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेवक नितीन पाटील, सागर जेधे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
