ठाकरे बंधूंचा ‘मास्टर प्लॅन’!

मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून आज सेना-मनसेच्या मास्टर प्लानचे सुतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

ठाणे, कल्याण-डोंबोली, पुणेनाशिक इथे सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि येत्या एक-दोन दिवसांमध्ये या सगळ्याची घोषणा होईल, अशी माहिती सुद्धा राऊत यांनी दिली. राऊत म्हणाले की, मुंबई ही महत्त्वाची आहे. कालसुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेची नेतेमंडळी अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा, अशी आमची अपेक्षा आहे.

आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडीच सत्ताधारांसमोर आव्हान उभं करेल आणि महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत ना? पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेले, चर्चेला बसले. युती जाहीर करण्यासाठी एक शक्ती प्रदर्शन नक्की होईल. जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल याची मला खात्री आहे.उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील. ती महाराष्ट्राची गरज आहे. जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावे आणि लोकांना संबोधित करावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *