ठाण्यात १९४२
मतदान केंद्र
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठाण्यात १९४२ मतदान केंद्र असणार आहे तर, या केंद्रावरील कामांसाठी ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
शहरातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६७ इतकी असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मतदान केंद्र ही तळमजल्यावर तयार करण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठाणे महापालिकेची निवडणुक २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणुक होत आहे. २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण ३३ प्रभाग असणार आहेत. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणुक विभागाने उरकली असून त्यापाठोपाठ आता अंतिम मतदार याद्याही जाहीर केल्या आहेत. याशिवाय, प्रभागातील मतदान केंद्रही निश्चित केली आहेत.
