दोघात तिसरा नाहीच !
महायुतीतून राष्ट्रवादी आऊट
मुंबईत भाजप शिवसेनेत १५० जागांवर एकमत
मुंबई : राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या दोघात तिसरा पक्ष अजित पवरांची राष्ट्रवादी नसणारच हे आज स्पष्ट झाले. नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमचं काही देणंघेणं नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे, जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही असे भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी आज जाहिर केले आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वार्डांपैकी १५० जागांवरती महायुतीचे एकमत झालं आहे. उर्वरित ७७ जागांची चर्चा सुरू आहे, आणि ही चर्चा लवकरच पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अमित साटम यांनी दिली. आज अमित साटम आणि उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
अमित साटम म्हणाले की, उर्वरित जागांवर अंतिम निर्णय राज्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमत करतील. भाजप, शिवसेना आणि रिपाई महायुती इतकी घट्ट आहे की, धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहे. शेवटी महत्त्वाचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मुंबईकरांसाठी काम करणं असे साटम म्हणाले.
