पंतप्रधान मोदींना ओमानचा
सर्वोच्च नागरी पुरस्कार
नवी दिल्ली : ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांनी गुरुवारी मस्कट येथे पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान केला. यावेळी आज 21व्या शतकातील भारत धाडसी आणि वेगवान निर्णय घेतो, महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवतो आणि ठरवलेल्या कालमर्यादेत निकाल आणून दाखवतो,” अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
भारतीय समुदायासोबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ही सभा भारताच्या ‘विविधतेत एकता’ या भावनेचे प्रतीक आहे. भारत-ओमान मैत्री पर्व हे दोन्ही देशांमधील स्थायी मैत्रीचे प्रतीक असून भारतीय समुदाय या नात्याला अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”
या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारत आणि ओमान दरम्यान झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. या करारामुळे भारताच्या ९८ टक्के निर्यातीला, ओमानमध्ये करमुक्त प्रवेश मिळेल. यात कापड, कृषी उत्पादने आणि चामड्याच्या वस्तूंचा समावेश आहे. या बदल्यात भारत ओमानमधून येणारे खजूर, संगमरमर आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील शुल्क कमी करणार आहे.
हा करार आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीपासून लागू होणे अपेक्षित आहे. विशेषतः अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारल्याच्या पार्श्वभूमीवर, ओमानसोबतचा हा करार भारतीय निर्यातीसाठी अत्यंत दिलासादायक आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
photo caption
ओमान दौऱ्यात भारतीय नागरीकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
