माणिकराव कोकाटेंचा राजीनामा;
अटक टाळण्यासाठी रुग्णालयात
मुंबई : बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटणारे राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशीरा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवारांकडे सोपविला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंना २ वर्षांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावल्यानंतर लगोलग त्यांच्याकडील मंत्रीपदाची खाती अजित पवारांकडे सोपवली. त्याबाबत राज्यपालांकडून तशी मंजुरीही त्यांनी मिळवली.
दरम्यान, दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात पोलिसांकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात जोपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर होती. त्यामुळे प्रत्येक राजकारणी करतो तेच कोकाटेंनी केले. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने मुंबईतील लिलावती रूग्णालयात ते दाखल झाले.
ॲड. माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून विविध कारणांमुळे वादात अडकले होते. शेतकरी कर्जमाफीबद्दल त्यांनी केलेले विधान किंवा विधिमंडळात मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रकरण असो, पक्षाने वेळोवेळी त्यांची बाजू सावरून घेतली होती. मात्र बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोकाटे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले.
कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाइलवर गेम खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यासंबंधी दोन व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केले होते. त्यानंतर बराच वाद उफाळला होता. मध्यंतरी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. “एखादा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो, तरीही काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात,” असे कोकाटे म्हणाले होते. यासाठीच त्यांचे कृषी खाते काढून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले होते.
भाजपा तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. भाजपाचे काहीच राहिलेले नाही. इकडून फोड, तिकडून फोड, फोडाफोडीमध्ये त्यांचे आयुष्य चालले. त्यांचे बिचारे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत”, अशी टीका कोकाटे यांनी नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान केली होती.
नेमकी माणिकरावांनी काय लबाडी केली ?
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बोगस दस्तावेज देऊन लाटल्याच्या गुन्ह्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे दोषी ठरविण्यात आलेत. कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
