माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी

पोलिस लिलावतीत रूग्णालयात

मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पुरती फिल्डींग लावली असून ते उपचार घेत असलेल्या मुंबईतील लिलावती रूग्णालयात नाशिकचे पोलिस दाखल झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने अखेर कोकाटेंनी राजीनामा दिला आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून काढून घेतली होती. त्यानंतर कोकाटे यांनी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. अजित पवार यांनी याबाबत माहिती देत कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जो पुढे फडणवीस यांनी राज्यपालांकडे पाठवून दिला.दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपविण्यात आली आहेत.

कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास असल्यची प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली. “माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे,” असं अजित पवार यांनी आपल्या व्टिटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू,” असंही अजित पवार यांनी म्हटलं. गेल्या वर्षभरात राजीनामा देणारे माणिकराव कोकाटे हे दुसरे मंत्री आहेत. याआधी धनंजय मुंडे यांनी बीडमधिल सरपंच देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर राजीनामा दिला होता.

photot caption

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिकचे पोलिस मुंबईत दाखल झाले असून त्यांनी लिलावती रुग्णालयात पुढील कारवाईसाठी रात्री उशीरा डॉक्टरांची भेट घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *