
ठाणे जिल्ह्यातील खंडेश्वरी लेणी
मुंबई : गड-किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील तब्बल ३९० राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यात येणार आहेत,यासंदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे.
या समितीमध्ये महसूल, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वने आणि बंदरे विकास मंत्री तसेच वित्त, नियोजन, सांस्कृतिक कार्य विभाग, नगरविकास (१), गृह, महसूल, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम विभाग वने, आणि बंदरे विकास विभाग सचिवांचाही समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता कार्यवाही शासनाने सुरु केली आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविणे देखील स्मारकाच्या संवर्धनाकरिता पूरक ठरते. तसेच जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास झाल्याने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला पर्यायाने जिल्ह्याच्या विकासास गती मिळते. २० जानेवारी २०२५ रोजी निर्गमित शासन निर्णय हा केवळ केंद्र संरक्षित राज्य संरक्षित व असंरक्षित किल्ले यांच्यावरील अतिक्रमणे हटविण्याकरिता होता. सदर शासन निर्णयाअन्वये जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले होते. म्हणून महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त रहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय समितीची नेमणूक करण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
स्मारकाचे जतन व संवर्धन अतिक्रमण निष्कासनासाठी नियोजन विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना थेट निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
३९० राज्य संरक्षित स्मारक
महाराष्ट्रात एकूण ३९० राज्य संरक्षित स्मारके असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील खंडेश्वरी लेणी, मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान, धारावी किल्ला, सेंट जॉर्ज किल्ला, रायगडमधील वासुदेव बळवंत फडके जन्मस्थान, रत्नागिरीतील कातळ शिल्पे, खेड येथील बौद्ध लेणी, अहिल्यानगर येथील निंबाळकर गडी, सेनापती बापट जन्मस्थान, जिल्हा नाशिक येथील पार्श्वनाथ जैन लेणी, सांगलीतील यशवंतराव चव्हाण जन्मस्थान, कोल्हापूर मधील बाजीप्रभू व फुलाजीप्रभू यांचे जन्मस्थान अशा स्मारकांचाही त्यामध्ये समावेश आहे. राज्यात १४५ राज्य संरक्षक मंदिरे असून तुळजाभवानी मंदिरासह जेजुरीचे खंडोबा मंदिर अशा छोटया मोठया मंदिरांचा समावेश आहे.
