निवडणूका संपल्या, रेल्वेप्रवास महागला

मुंबई : राज्यातील निवडणूकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच मतदार राजाच्या खिशाला कात्री लावण्याचे काम भारतीय रेल्वेनं केले आहे. रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. रेल्वेनं नव्य दरांची अंमलबजावणी येत्या  २६ डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचं म्हटलं.

भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी २१५ किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत.

जनरल तिकीटाचे दर २१५ किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉन एसीसाठी 2 पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 2 पैसे अधिक मोजावे लागतील.

रेल्वेनं प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडली आहे. प्रवास भाडे वाढवल्यानं रेल्वेला या वर्षात ६०० कोटी रुपये मिळणार आहेत. ५०० किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये अधिक द्यावे लागतील.

गेल्या १० वर्षात रेल्वेनं नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्यानं खर्च १,१५,००० कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील ६० हजार कोटींनी वाढला आहे. २०२४-२५ मधील रेल्वे चालवण्याचा खर्च  २६३००० कोटी रुपये झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *