नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी, सिने अभिनेत्री व शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल देशमुख, अध्यक्ष वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंग पवार, शालेय समिती अध्यक्षा प्रीती कांकरिया, मुख्याध्यापिका सुचिता भोर, मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस, तसेच राम बडोदे, दिपाली साळवे, नंदकिशोर चव्हाण यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे डॉ. अमोल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईलच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. तर कु. स्नेहल देशमुख यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे निवेदन शाळेतील विद्यार्थिनींनी उत्तम पद्धतीने केले. सूत्रसंचालन नंदिनी बालाजी वाळके हिने आकर्षक शैलीत करून प्रेक्षकांची मनं जिंकली. नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यावरील हस्तलिखित पुस्तिका तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयावर आधारित हस्तलिखित पुस्तिका यांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृष्णलीला, छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट, कोळीगीत, शिवलीला, मानवी जीवनातील नवऱस, प्रकृतीची पंचतत्त्वे आणि विविधतेतील एकता–भारताचे सांस्कृतिक वैभव अशा विषयांवर नृत्यनाट्य आणि सादरीकरणे सादर केली. अंगणवाडीच्या चिमुकल्यांचे सादरीकरण विशेष दाद मिळवणारे ठरले. समारोप व्यास मॅडम यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरम् गायनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारखी मॅडम, वनीस मॅडम, शुक्ल मॅडम तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांनी घेतलेल्या परिश्रमांचे पालकांनी विशेष कौतुक केले.
