मुक्त विद्यापीठ – राष्ट्रीय पुस्तक न्यासचा संयुक्त उपक्रम
नाशिकमध्ये तीन दिवसीय ‘अनुवाद कार्यशाळे’चे आयोजन
हरिभाऊ लाखे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, भाषा अनुवाद केंद्र आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी – नॅशनल बुक ट्रस्ट), भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विशेष ‘अनुवाद कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ मुख्यालयात शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर ते रविवार २८ डिसेंबर या कालावधीत ही कार्यशाळा होईल.
विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीतील सभागृहात या कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी यांच्या ह्स्ते होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ विद्वत परिषद सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, विद्यापीठाचे कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत पहिल्या दिवशी डॉ. चंद्रकांत पाटील यांचे बीजभाषण होईल. त्यानंतर डॉ. गोरख थोरात (‘भाषांतर स्वरूप आणि प्रकार’ – हिंदी-मराठी भाषांतर), डॉ. दिलीप धोंडगे (अर्वाचिनीकरण व सुलभीकरण) या विषयावर मार्गदर्शन करतील.
शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम सत्रात ‘अनुवादकाचे अनुभव व समस्या’ या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध अनुवादक अपर्णा वेलणकर, ॲड. अभय सदावर्ते आणि कृष्णा किंबहुने मतप्रदर्शन करतील. द्वितीय सत्रात डॉ. रमेश वरखेडे ‘समाजभाषा आणि अनुवाद’ या विषयावर भाष्य करतील. दोन्ही दिवशी तृतीय सत्रात कृतिसत्र होईल. त्यात डॉ. मंगला वरखेडे, डॉ. राजेंद्र कुंभार, चंद्रकांत भोंजाळ, प्रफुल्ल शिलेदार, डॉ.अश्विन किनारकर, डॉ. गिरीश पिंपळे, डॉ. विद्या सुर्वे व कु. शीतल कोकाटे यांचा प्रमुख सहभाग असेल. ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल. डॉ. रमेश वरखेडे अध्यक्षस्थानी तर डॉ. दिलीप धोंडगे आणि विद्यापीठ विद्वत परिषद सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्र तथा भाषा अनुवाद केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे कार्यशाळेचे समन्वयक आहेत.
