बल्याणीतील बेपत्ता ११ वर्षीय शुभम अखेर दीड दिवसाच्या शोधानंतर बांद्रा येथे सुखरूप सापडला
कल्याण : कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील टिटवाळा नजीकच्या बल्याणी परिसरातून बेपत्ता झालेला ११ वर्षीय शुभम कुमार अर्जुन जयस्वाल अखेर पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा परिसरात सुखरूप आढळून आल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसराने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तब्बल दीड दिवस चाललेल्या व्यापक आणि सातत्यपूर्ण शोधमोहीमीनंतर हा महत्त्वाचा शोध लागला.
बनेलीतील गुप्ता चाळ परिसरात राहणारा शुभम सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींनी परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला; तरीही शुभम सापडला नाही. अखेर त्याचे भाऊ संदीप जयस्वाल यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवताच पोलीस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासणी, संभाव्य मार्गांवर पथके तैनात करणे, रेल्वे स्थानकांवर माहिती संकलन तसेच विविध ठिकाणी चौकशी अशी सर्वंकष शोधमोहीम हाती घेतली.
कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग दीड दिवस अहोरात्र परिश्रम घेत प्रत्येक शक्य दुव्याचा मागोवा घेतला. तपासाअंती शुभम पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा परिसरात असल्याची माहिती काल रात्री उशिरा मिळताच पथकाने तत्काळ हालचाल करत त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. शुभम सापडल्याची बातमी मिळताच कुटुंबीयांचा आनंद अनावर झाला, तर परिसरातील नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे आणि समन्वयाचे कौतुक केले.
