मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बलसंवर्धन शिबिराचे आयोजन
कल्याण : लहान वयातच मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बलसंवर्धन शिबिराचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले असून कल्याणच्या शिवसेना शहर शाखेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांकरिता घेण्यात येत असलेल्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या बसेसला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, युवसेना जिल्हा प्रमुख अभिषेक मोरे, उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक विद्याधर भोईर आयोजक समीर देशमुख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
शहराच्या चाकोरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर,गर्द वनराईने नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळावी, त्यातून काही नविन शिकता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बलसंवर्धन शिबिराचे आयोजन २५ ते २८ डिसेंबर दरम्यान कर्जत येथील जामरुंग येथे करण्यात आले आहे. या शिबिरात ८ ते १२ वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येतो.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणे, तंबूत राहून निसर्गाचा आनंद घेणे, एअरगनने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षीनिरीक्षण, कवायत, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, शेकोटी आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात येतात. या बलसंवर्धन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळत असल्याची माहिती यावेळी शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.
