आगामी उल्हासनगर मनपा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
उल्हासनगर : उल्हासनगरच्या वेशीवर असणाऱ्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर धार्मिक पर्यटन स्थळ प्रकल्पामुळे वाढलेल्या जमिनीच्या किमती पाहून भुमाफियांनी आता उल्हासनगरमधील मुस्लीम दफनभूमीची जागा हडपण्याचा कट रचला आहे. या कारस्थानात महानगरपालिकेचे अधिकारी खोटा अहवाल देऊन साथ देत असल्याचा गंभीर आरोप मुस्लीम समाजाचे नेते डॉ. शहाबुद्दीन शेख आणि अब्दुल गफार, अनिल सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे . या अन्यायाचा निषेध म्हणून आगामी महानगरपालिका निवडणुकीवर मुस्लीम समाज सामूहिक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कैलास कॉलनीतील भूखंड क्रमांक २४३ आणि २४४ हे १९७४ पासून दफनभूमीसाठी राखीव आहेत. २०१९ मध्ये पालिकेने या जागेला अधिकृत दफनभूमी घोषित केले होते, मात्र आता नगरविकास विभागाला खोटा अहवाल पाठवून ही जागा दफनभूमीसाठी अयोग्य असल्याचे भासवले जात आहे. विशेष म्हणजे, याच जागेवर पालिकेने यापूर्वी ४० लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत व गेट उभारले आहे.
आमदार बालाजी किणीकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीत दफनविधीला मंजुरी देण्याचे आश्वासन देऊन मते घेतली, मात्र आता ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच ओमी कलानी टीमनेही केवळ निवडणुकीपुरते मुस्लीम समाजाचा वापर केल्याची टीका करण्यात आली. शेजारील हिंदू स्मशानभूमी आणि ख्रिश्चन दफनभूमीला विरोध नसताना केवळ मुस्लीम दफनभूमीलाच लक्ष्य केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या या विश्वासघातामुळे आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा डॉ. शेख आणि मुस्लिम नेत्यांनी दिला आहे.
