मूलभूत प्रश्नांवर परिणामकारक कार्याचा निर्धार

रमेश औताडे

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील पाणी, रस्ते, कचरा, आरोग्य, शिक्षण आणि महिला सुरक्षा या मूलभूत प्रश्नांवर ठोस व परिणामकारक काम करणार असल्याचा निर्धार भावी नगरसेविका नेहा सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.

प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १८६ मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या गौतमी सुनील जाधव यांच्या कन्या असलेल्या नेहा जाधव या आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेतर्फे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपला स्पष्ट आणि आक्रमक अजेंडा मांडला. धारावीतील नागरिकांसाठी २४ तास आरोग्यसेवा, महिलांसाठी सुरक्षित व परवडणाऱ्या प्रसूती सुविधा, तसेच स्थानिक क्लिनिक सक्षम करणे हे आपल्या कामाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे असून मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण, इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण, वाचनालयांची उभारणी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालय परिसरात नियमित पोलिस गस्त, दामिनी पथक सक्रिय करणे, तसेच कराटे व बॉक्सिंगसारखे स्वसंरक्षण प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. “धारावीतील नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित होऊ देणार नाही. महापालिकेत ठामपणे आवाज उठवून नागरिकांचे हक्क मिळवून देणार,” असा विश्वास नेहा जाधव यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *