नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबधित विभागांची बैठक घेऊन अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर उतरुन अधिक प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते व त्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरुवातही करण्यात आलेली आहे.
यामध्ये एक महत्वाचा घटक बांधकाम व्यावसायिकांचा असून बांधकाम साईट्स वरील प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मानक कार्यप्रणाली महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे. त्याचे काटेकोर पालन सर्व विकासकांकडून करण्यात यावे या करिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७० हून अधिक विकासक व वास्तुविशारद उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी नवी मुंबई शहरातील पर्यावरण उत्तम रहावे व येथील हवा गुणवत्ता निर्देशांक नेहमीच चांगला रहावा या करिता प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या बांधकामाच्या ठिकाणी सर्व प्रकारची प्रदूषण प्रतिबंधात्मक कार्यवाही व उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात असे सूचित केले.या प्रसंगी सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण व नगररचनाकार युवराज चव्हाण उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. सदर कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंग यांच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेली Suo Moto जनहित याचिका क्र.३/२०२३ मध्ये मा.उच्च न्यायालयाने दि. ११/१२/२०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायु प्रदूषण व ब्लास्टींग करीता अवलंबवायची “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure – SOP”) व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाबाबतच्या दंडात्मक कारवाई बाबत दि.०१/०८/२०२4 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत परिपत्रक पारीत करण्यात आले आहे.
तसेच मुंबई महानगर प्रदेश (MMR) करीता उपरोक्त ध्वनी व वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत मा. उच्च न्यायालयामार्फत दि.२८/११/२०२५ रोजी आदेश पारीत करण्यात आलेले आहेत व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
सदर समितीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम सुरु असलेल्या एकूण ८५ बांधकाम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांची, तुर्भे येथील RMC प्लान्टची व महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामांची १३ डिसेंबरला स्थळ पाहणी केली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मानक कार्यप्रणाली (SOP) मधील उपाययोजनांची सर्व बांधकाम साईटवर प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासक व वास्तुविशारद यांची आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये आयुक्तांनी मा. उच्च न्यायालयात महानगरपालिकेच्या वतीने वायू प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विविध उपाययोजना करण्याचे सूचित केले. यानुसार,
· बांधकाम साईटवर सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरे तसेच हवेची गुणवत्ता मोजमाप दर्शविणारे डिस्प्ले बसविण्याबाबत बांधकाम परवानगीमध्ये अट नमूद करण्यात येईल.
· सदर वायू गुणवत्ता मापन यंत्रणा केंद्रीकृत डॅशबोर्डशी एकत्रित करून प्रत्यक्ष वेळेत माहिती संकलन, अहवाल निर्मिती व वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) मर्यादा ओलांडल्यास स्वयंचलित इशारा प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी. या डॅशबोर्डद्वारे नवी मुंबई महानगरपालिका व MPCB यांना दैनंदिन माहिती उपलब्ध होईल तसेच धूळ निर्माण होणाऱ्या ठिकाणी AQI सेन्सर योग्य ठिकाणी बसविण्यात यावेत.
· महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) विद्यमान वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (AQMS) व्यतिरिक्त, नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक २ चौ. कि.मी. क्षेत्रासाठी १ या प्रमाणात एकूण ५५ वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (AQMS) बसविण्याची प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येईल.
· नवी मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत साप्ताहिक माहिती नोंदविण्यासाठी गुगल स्प्रेडशीट (Google Spreadsheet) स्वरूपातील तपासणी यादी विकसित करून त्याची लिंक सर्व विभागीय अधिकारी यांना वितरीत केली आहे. संबंधित विभागांनी सदर तपासणी यादीप्रमाणे कारवाईची माहिती नियमितपणे अद्ययावत करणे बंधनकारक राहील.
· बांधकाम परवानगी देताना, संबंधित प्रकल्पातील कामगार / मजुरांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी सविस्तर मानक कार्यप्रणाली (SOP) परवानगीच्या अटींमध्ये समाविष्ट करण्यात येईल व त्याचे पालन करणे पुढील प्रमाणपत्रांसाठी पूर्वअट राहील. SOP चे उल्लंघन आढळल्यास बांधकाम कामे थांबविणे तसेच बांधकाम परवानगी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
·खोदकाम / रस्त्याचे खोदकाम करणे / उत्खनन कामांसाठी परवानगी देताना धूळ नियंत्रण व सुरक्षिततेसाठी धातू किंवा प्लास्टिकचे कडक बॅरिकेड्स उभारणे तसेच निर्माण झालेला मलबा दररोज हटविणे ठेकेदारास बंधनकारक राहील. शक्य असल्यास, उत्खनन सुरू केल्यानंतर २४ तासांच्या आत सर्व कामे पूर्ण करून रस्ता / जागा पूर्ववत करणे आवश्यक राहील.
·धूळ पुन्हा हवेत उडू नये यासाठी फॉगिंगऐवजी रस्ते धुण्यास प्राधान्य देण्यात येत असून ठाणे–बेलापूर मार्ग, सायन–पनवेल महामार्ग व आम्र मार्ग यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर दररोज दोन वेळा रस्ते स्वच्छता व धुलाई करण्यात येईल.
·नवी मुंबई शहरात EV चार्जिंग पॉईंट्स उभारण्याचे नियोजन आहे. बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा बेकायदेशीरपणे टाकला जातो तो रोखण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर दिवस-रात्र निगराणी ठेवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल व जनसहभाग प्रोत्साहित केला जाईल.
i) उड्डाणपुलांखाली विनाकारण उभी केलेली वाहने हटवून आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
ii) कचरा जाळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी करून उल्लंघन आढळल्यास दंड आकारण्यात येईल.
· हिवाळी हंगामात वाढणारी धूळ व धुरकटपणा लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष “रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण” मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने मा. उच्च न्यायालयात सादर केलेल्या सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने, सर्व बांधकाम प्रकल्पस्थळी महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) मधील उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत सर्व विकासकांना सूचित करण्यात आले तसेच विकासकांच्या अडचणी व सूचना विचारात घेऊन आवश्यक उपाययोजनांची पूर्तता सुनिश्चित करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले.
